Pimpri: ‘पालिका आयुक्त पैसे खातात, हे कोणी सांगितले, ते सभागृह नेत्याने जाहीर करावे’

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी

‘आयुक्त एक रुपया खात नसतील तर पैसे कोण खातय याची यादी द्या’- मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे पैसे खातात, असा कोणीही आरोप केला नसताना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आयुक्त एक रुपयाही खात नसल्याचा दावा केला. त्यामुळे आयुक्त पैसे खातात हे कोणी सांगितले, ते सभागृह नेत्याने जाहीर करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे. तसेच आयुक्त एक रुपया खात नसतील तर पैसे कोण-कोण खातय याची यादी जाहीर करण्याची विनंती केली.

याबाबत सभागृह नेते एकनाथ पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पालिकेच्या गुरुवारी झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात झालेल्या खडाजंगी वर चर्चा झाली. या चर्चेत अनेक सदस्यांनी आपआपली मते प्रकट केली. या चर्चेमध्ये सभागृहातील कुठल्याही सदस्याने आयुक्त पैसे खातात असा थेट आरोप केलेला नसताना सभागृह नेते पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या रुपाने चांगले आयुक्त मिळाले आहेत. ते अतिशय हुशार असून, चांगले काम करीत आहेत. आयुक्त हर्डीकर एक रुपया देखील खात नाहीत असा दावा सभागृहात केला.

महापालिकेतील गेल्या दीड वर्षांत गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आम्ही अनेक आरोप केले. यामध्ये टेंडर मध्ये रिंग, मर्जीतील ठेकेदारांना झुकते माप, सल्लागार नियुक्त्या, कामांच्या मुदतवाढी यासह विविध विषयांबाबत आम्ही आरोप केले. भ्रष्टाचार हा केवळ पैशांचाच नसतो आर्थिक, नैतिक, यांमध्ये देखील भ्रष्टाचार असू शकतो.

सभागृहात व मागील दीड वर्षांत आयुक्त पैसे खातात असा थेट आरोप कोणीही केलेला नसताना, ‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीप्रमाणे पूर्वी आयुक्तांनी व गुरुवारी सभागृह नेत्याने वक्तव्य केले काय ? आयुक्त पैसे खातात हे आपल्याला नक्की कोणी सांगितले ? तसेच आयुक्त जर एक रुपया ही खात नसतील तर या महापालिकेत कोण-कोणते पदाधिकारी,अधिकारी पैसे खातात याची यादी सभागृह नेत्याने जाहीर, करावी अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.