Pimpri RTO News : क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक करणाऱ्या 332 वाहनांवर ‘आरटीओ’ची कारवाई

एमपीसी न्यूज – क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालया कडून (आरटीओ) कारवाई करण्यात येत आहे. मागील सहा महिन्यात 332 वाहनांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली. तर,  जवळपास 1 हजार 48 वाहनांची तपासणी केली. 

याबाबत अधिक माहिती देताना पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, ” पिंपरी-चिंचवड शहरात सर्रासपणे मालवाहतूक वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेला जातो. शहरातील एमआयडीसी भागासह महामार्गावर ओडीसी (ओव्हर डायर्मेशन कार्गो) वाहतूक बिनधक्कपणे केली जाते. मागील सहा महिन्यात केलेल्या कारवाईचा वेग आणखी वाढवला जाणार आहे.

कोरोनाच्या काळात वाहतुकीवर निर्बंध आणले होते. त्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली. मात्र, या काळात मोठया प्रमाणात अत्यावश्यक वाहतूक व्यवस्था कार्यरत होती. त्याचबरोबर आरटीओचे वायुवेग पथकही तैनात होते. या पथकाने या काळात क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम हाती घेतली होती.

मागील महिन्यात या पथकाकडून 208 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात जवळपास 50 हून अधिक वाहने दोषी आढळून आली. तर, गेल्या सहा महिन्यात जवळपास 1 हजार 48 वाहनांची तपासणी केली आहे.

अवजड वाहने त्यांच्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेल्याने धोका निर्माण होतो. त्यावर नियंत्रण राहण्यासाठी आरटीओचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. शहरातील कंपन्या आणि महामार्गालगत हे पथक गस्त घालत असते.

त्यानुसार अवजड वाहनांची तपासणी करुन अशा वाहनांवर ते थेट दंड ठोठावत आहेत. गेल्या सहा महिन्यात या पथकाने 332 वाहनांवर कारवाई करत वाहन चालक-मालकांकडून 80 लाखांचा दंड वसूल केला असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आदे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.