Pimpri : मडिगेरी यांची उमेदवारी बदलण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा स्थानिक नेत्यांचा पवित्रा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निष्ठावान आणि स्थायीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले विलास मडिगेरी यांना भाजपने दिलेली उमेदवारी बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा स्थानिक नेत्यांनी पवित्रा घेतला आहे. त्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरु असल्याचे समजते.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने विलास मडिगेरी यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपच्याच शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु, मडिगेरी यांची पक्षाची अधिकृत उमेदवारी बदलावी यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. गतवर्षी स्थायी समिती सदस्यत्वाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्यांचे राजीनामे घेतले होते. यावेळी ते घेतले नाहीत. त्यामुळे इतरांवर अन्याय होईल, अशी भूमिका घेत उमेदवारी बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा स्थानिक नेत्यांनी पवित्रा घेतल्याचे समजते. या दबावापुढे पक्षश्रेष्ठी झुकणार की निर्णयावर ठाम राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गतवर्षी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विलास मडिगेरी आणि शीतल शिंदे यांच्यात चुरस होती. परंतु, चिंचवड मतदार संघातील ममता गायकवाड यांना ऐनवेळी संधी देण्यात आली. मडिगेरी यांनी त्यांच्या नेतृत्वात समितीत काम केले. तर, शिंदे राजीनामा देऊन समितीच्या बाहेर पडले होते. यावेळी पुन्हा शिंदे यांची स्थायी समितीत सदस्य म्हणून निवड झाली आहे.

विलास मडिगेरी हे भाजपचे निष्ठावान, जुने आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत. भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्यासोबत मडिगेरी यांनी काम केले आहे. पक्षाच्या प्रतिकूल काळात संघटना मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाखेत सुरुवातीपासून काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या इंद्रायणीनगर परिसरातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. दोनवेळा त्यांच्या पत्नी वर्षा मडिगेरी आणि आता तिस-या वेळी ते स्वत: मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता येताच त्यांना मोठे पद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांना पहिल्या वर्षात कोणतेही पद मिळाले नाही. दुस-या वेळी स्थायी अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार असताना ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले. तरीही पक्षावर नाराज न होता. ते काम करत राहिले. आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर एकही आरोप झाला नाही. कोणत्याही वादात अडकले नाहीत. भाजपचा स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या सर्व जमेच्या बाजू असल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पक्षाने त्यांच्या नावाला कौल दिला आहे.

परंतु, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. मडिगेरी यांची उमेदवारी बदलावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा स्थानिक नेत्यांनी पवित्रा घेतल्याचे समजते. या दबावापुढे पक्षश्रेष्ठी झुकणार की निर्णयावर ठाम राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.