Pimpri: सामाजिक संस्थांची मदत अन् नगरसेवकांची चमकोगिरी !

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्याने गोरगरिब, हातावरील पोट असणा-यांसाठी विविध सामाजिक संस्थांकडून पिंपरी महापालिकेला मदत केली जात आहे. यामध्ये अन्न पदार्थ व शिधा दिला जात आहे; मात्र हीच मदत घेऊन काही नगरसेवक प्रभागात चमकोगिरी करत आहेत. आपणच मदत करत आहोत, अशा अविर्भावात मदतीचे वाटप केले जात आहे. त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले जात आहेत. अशा आपत्तीत देखील नगरसेवक चमकोगिरी करत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरात एक हजाराच्या पुढे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात नऊ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या आजराने पुण्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अनेकजण घरी आहेत, तर अनेकांच्या हाताला रोजगार नाही.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही नागरिकांवर उपजिवीकेचा प्रश्न उद्भवला असल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये वृध्द, दिव्यांग, अनाथ, निराधार, बेवारस यांच्यासह काही विद्यार्थी, कामगार, रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती आदींचा समावेश आहे. या सर्वांना सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत अन्न आणि शिधा पुरविण्यासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत.

या संस्थांकडून महापालिकेला मोठी मदत केली जात आहे. परंतु, राष्ट्रीय आपत्तीसाठी आपले एक महिन्याचे मानधनही न देणारे काही नगरसेवक संस्थांनी केलेली ही मदत घेऊन प्रभागात चमकोगिरी करत आहेत. आपणच मदत करत असल्याचे नागरिकांना भासवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय आपत्तीतही नगरसेवकांकडून चमकोगिरी केली जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.