Tokyo : कोरोना जागतिक महामारीमुळे ऑलिंपिक एक वर्ष लांबणीवर

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीमुळे जगभर हाहाकार उडविलेला असल्याने जुलै 2020 मध्ये होणारे टोकियो ऑलिंपिक एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. ऑलिंपिकच्या नव्या तारखांची देखील आज घोषणा करण्यात आली. त्यानुसार 23 जुलै ते आठ ऑगस्ट 2021 दरम्यान या जागतिक स्पर्धा होतील.

कोरोना व्हायरसच्या जगभरातील उद्रेकाचा फटका टोकियो ऑलिंपिकला बसला आहे. जुलैमध्ये नियोजित ही जागतिक क्रीडा स्पर्धा आता एका वर्षाने पुढे ढकलण्याचा निर्णय यजमान जपान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने घेतला आहे.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग प्रादुर्भाव आता जगभरातल्या 189 देशांमध्ये झाला आहे. जगभरात सुमारे सात लाख लोकांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून मृतांचा आकडा 34 हजारपेक्षा वर आहे.

त्यामुळेच आधी कॅनडा आणि त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या संघानेही या स्पर्धेतून माघार घेतली होती. ही स्पर्धा पुढे ढकलावी, असे आवाहन अनेक देशांनी व नामवंत खेळाडूंनी केले होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.