Nigdi : स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान रंगणार

महेश काळे यांचा ‘स्वरध्यास’ कार्यक्रम ठरणार महोत्सवाचे आकर्षण

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील रसिक प्रेक्षक देखील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व्हावेत, त्यांनाही शास्त्रीय संगीताबरोबर सांस्कृतिक मैफल अनुभवता यावी या उद्देशाने पिंपरी-चिंचवड सोशल ट्रस्टच्या माध्यमातून स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती माहिती सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी दिली आहे.

गुरुवार (दि.28) ते शनिवार (दि. 2 मार्च) या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा ते दहा यावेळेत निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक 27 येथील सिटीप्राईड शाळेजवळील मैदानावर हा महोत्सव होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.

शरयू नगर प्रतिष्ठानच्या विशेष सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक, महापौर राहुल जाधव हे स्वागताध्यक्ष तर पिंपरी चिंचवडचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे हे महोत्सवाचे सांस्कृतिक सल्लागार असतील. या महोत्सवाचे उदघाटन गुरुवारी दि. 28 मार्च रोजी, सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

उदघाटन समारंभानंतर ‘सूर नवा, ध्यास नवा’ संगीत कार्यक्रमातील फेम टॉप 5 गायक ‘छोटे सूरवीर’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. यामध्ये उत्कर्ष वानखेडे, अंशिका चोणकर, सृष्टी पगारे, चैतन्य देवढे, स्वराली जाधव व सई जोशी यांचा समावेश असेल. याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका स्पृहा जोशी या करतील.

यानंतर महोत्सवाच्या दुस-या दिवशी शुक्रवारी (दि. 1) वैभव जोशी, दत्तप्रसाद रानडे आणि आशिष मुजुमदार यांचा ‘सोबतीचा करार’ हा मराठी गजलांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर श्रीधर फडके, आनंद माडगूळकर आणि जयंत देशपांडे यांचा ‘शब्द सुरांचे सोबती’ हा कार्यक्रम होणार आहे. चालू वर्ष हे ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके अर्थात बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचेच औचित्य साधत त्यांच्या आठवणी जागविणा-या ‘शब्द सुरांचे सोबती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये या तिघांचे काव्य व गीते यांचा समावेश असेल याबरोबरच त्यांचे काही किस्सेही सांगितले जातील ज्यामधून या तिघांचे व्यक्तिमत्व उपस्थितांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महोत्सवाच्या तिस-या दिवशी म्हणजे शनिवारी ( दि. 2) प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘तालवाद्य कचेरी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. या कार्यक्रमामध्ये स्वत: पं. विजय घाटे (तबला), श्रीधर पार्थसारथी (मृदंगम्), शीतल कोळवलकर (नृत्य), जयदीप वैद्य (गायन) व मिलिंद कुलकर्णी (संवादिनी) यांचे एकत्रित सादरीकरण असणार आहे. यानंतर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक व राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या ‘स्वर ध्यास’ या शास्त्रीय मैफलीने महोत्सवाची सांगता होणार आहे.

याबरोबरच मंगळवार दि. 26 फेब्रुवारी व बुधवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत पिंपरी येथील ऑटो क्लस्टर येथील सभागृहात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी समीर सूर्यवंशी यांना  9922502145 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील आयोजकांकडून करण्यात आले आहे.

महोत्सवाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, “नव्या पिढीपर्यंत संगीत पोहोचविण्याच्या दृष्टीने देखील आम्ही या महोत्सवाच्या माध्यमातून कार्यरत आहोत. यामध्ये स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे याचा देखील समावेश आहे. मागील तीन वर्षांपासून मी स्वत: प्रमुख सल्लागार म्हणून यामध्ये कार्यरत आहे. या महोत्सवानिमित मी नुकतेच फेसबुक इंस्टाग्रामवरून नव्या कार्यकर्त्यांना महोत्सवाशी जोडण्याचे आवाहन केले होते, त्याला आलेला प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा असून केवळ व्यासपीठ नाही तर व्यासपीठासमोर व मागे देखील रसिक घडविण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.