Chakan : शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मुस्लिमांची दुवा

चाकणमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध

एमपीसी न्यूज- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 41 जवान शहिद झाले. हा हल्ला देशाच्या लोकशाहीवरील हल्ला आहे. मुस्लिम समाज या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. भारतात अराजक माजवू पाहणाऱ्या पाकिस्तानचा डाव कदापि यशस्वी होणार नाही. हल्ले करणारे खरे मुस्लिम असूच शकत नाहीत, कारण मुस्लिम समाज शांतताप्रिय समाज आहे. त्या 41 कुटुंबांसोबत आमच्या संवेदना असल्याची दुवा मुस्लिम समाजाच्या वतीने चाकण येथे शुक्रवारी (दि.22 ) पढण्यात आली.

मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. मुस्लिम मौलानांनी शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दुवा केली. मुस्लिम बांधवानी दिलेल्या पाकिस्तान मुर्दाबाद आणि भारत जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.

चाकण पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष समीर सिकीलकर म्हणाले, “मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र कुराणमध्ये असे लिहिले आहे की, तुम्ही जर एखादा मानवतेचा बळी घेतला तर तो इस्लाम धर्मीय असू शकत नाही”

अस्लमभाई सिकीलकर म्हणाले, “जो कोणी व्यक्ती असे विध्वंस करत असतील तर इस्लाम अशा गोष्टीसाठी कधीही मान्यता देणार नाही” यावेळी नगरसेविका हुमा जहीर शेख, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलचे सरफराज सिकीलकर, अशपाक शेख, अजित सिकीलकर, आरिफ काझी, नजीर बागबान, अनिस काझी, वासिम काझी, सलीम सिकीलकर, मौलाना रफिक रिजवी यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. सर्व शाहिद जवानांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.