Pimpri : सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीतर्फे सातवीच्या विद्यार्थांसाठी टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच शाळांना भौतिक सुविधा देखील दिल्या जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये बहुतेक शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब घरातून येत असतात. आपल्या महापालिका शाळांचा दर्जा खाजगी शाळांप्रमाणे अद्यायवत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण होईल, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ होऊन प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढेल. यासाठी महापालिका शिक्षण समितीने प्रयत्न सुरू केले आहेत.

महापालिकेच्या बारा प्राथमिक शाळा या उपक्रमशील आहेत. या बारा प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. अशा अनेक योजनांमुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची गोडी लागेल आणि महापालिका प्राथमिक शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढून विद्यार्थी पटसंख्येत देखील वाढ होणार आहे.

महापालिका शिक्षण समिती सदस्यांनी सर्व प्राथमिक शाळांमध्ये दौरा केला असता तेथील विविध भौतिक सुविधांबाबत अनेक समस्या निर्दशनास आल्या. त्यानुसार महापालिका स्थापत्य विभागातर्फे आपल्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या प्राथमिक शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर स्वच्छतागृह, विशेष करून मुलींची स्वच्छतागृहे, इमारतींची देखभाल व दुरूस्ती, रंग आदी विविध आवश्यक कामे त्वरित करून घेतली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.