Pimpri: पुणे मेट्रो निगडीपर्यंत धावणार; महासभेची मान्यता

पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो असे होणार नामकरण 

एमपीसी न्यूज – पिंपरी -चिंचवड महापालिका भवन ते निगडी या दरम्यान मेट्रो धावण्याचा मार्ग मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावर उभारण्यात येणा-या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार 253 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल ( डिपीआर ) महामेट्रोतर्फे तयार करण्यात आला असून महापालिका सभेने आज ( गुरुवारी ) त्याला मंजुरी दिली. तसेच, पिंपरी – निगडी दरम्यान धावणा-या मेट्रोचे नामकरण पुणे – पिंपरी चिंचवड मेट्रो करण्याचा ठराव पारित केला. हा ठराव राज्य आणि केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार  असून त्यांच्या मंजुरीनंतरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची नियमित सभा आज (गुरुवारी) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

पुणे मेट्रोची मार्गिका क्रमांक एक पूर्वी पिंपरीपर्यंतच होती. पहिल्या टप्पयात ही मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठविला होता. पिंपरी-चिंचवड सीटीझन फोरमतर्फे विविध मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी महापालिकेने महामेट्रोला डिपीआर तयार करण्यास सांगितले. महामेट्रोने ‘सिस्ट्रा’ या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हा डिपीआर तयार करून घेतला आणि महापालिकेकडे सादर केला.

हा डीपीआर गुरुवारी महासभेपूढे सादर झाला. चर्चेअंती त्यास मान्यता देण्यात आली. महापालिका सभेच्या मान्यतेनंतर राज्य आणि केंद्र सरकारकडे तो सादर करण्यात येणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका भवन ते निगडीपर्यंत ही मेट्रो जाणार असून या मार्गाचे एकूण अंतर 4.413 किलोमीटर इतके आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी मेट्रोस्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहीन्यांचे स्थलांतर करणे आदी कामासाठी एक हजार 253 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यापैकी 155 कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.