Pimpri : फळाची अपेक्षा न करता केलेले काम म्हणजे ईश्वराची पूजा -अण्णा हजारे

निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी दाम्पत्यास यशवंत-वेणू पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – फळाची अपेक्षा न करता केलेले काम ही ईश्वराची पूजा आहे. हे निष्काम कर्म चंद्रकांत दळवी यांनी केले आहे. म्हणून त्यांना यशवंत-वेणू पुरस्कार प्राप्त झाला, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने देण्यात येणारा यशवंत-वेणू सन्मान यावर्षी निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि त्यांच्या पत्नी पद्मा दळवी यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात अण्णा हजारे बोलत होते. राळेगणसिद्धी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचवड येथील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे होते. लायन्स क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अण्णा हजारे म्हणाले, “स्वतःचा प्रपंच करताना समाजाचाही प्रपंच करावा. स्वतःसाठी जगताना इतरांचा विचार केला तर सेवाभाव निर्माण होतो. सेवा करताना गाव जनता राष्ट्र हे मंदिर आहे. तसेच शुद्ध विचार आत्मसात करावेत. शुद्ध आचार अंगिकारता आले पाहिजेत. जमिनीत जे कणसाचे दाणे गाडून घेत नाहीत. ते पिठाच्या गिरणीत जातात आणि संपतात.”

गिरीश प्रभुणे म्हणाले, “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आलेल्या या व्यक्तींचा अण्णा हजारे यांच्या सारख्या व्यक्तीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्रावरील केलेलं ऋण विसरता येत नाहीत. ते दिल्लीला गेले तरी लक्ष मात्र महाराष्ट्रावर होते. जिल्हा परिषद, पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था ही यशवंतरावांची देण आहे.”

पुरस्काराला उत्तर देताना निवृत्त विभागीय आयुक्त  चंद्रकांत दळवी म्हणाले, “यशवंत वेणू पुरस्कार हा दिवस माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. राळेगणसिद्धी येथे जन्मलेली संपन्नता देशभर जाते. अशा ग्रामविकासाच्या पंढरीत हा सत्कार होत आहे. मी गावाचा, गाव माझा असं समजून जे काम करतात म्हणून विकासाची पंढरी निर्माण होते. घरातून साथ मिळाली तरच ती व्यक्ती बाहेरच्या जगात मोठी होते. मलाही पत्नीची साथ मिळाली. म्हणून मी समाजासाठी काहीतरी करू शकलो.”

या सोहळ्यात युवा अकादमी पुरस्कार प्राप्त फेसाटी कादंबरीला बळीवंश पुरस्काराने सन्मानित केले. कार्यक्रमात बाजीराव सातपुते यांचे ‘देवराष्ट्र ते महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने युवा पुरस्कार शिरूर तालुक्यातील करंजी गावचे युवा कार्यकर्ते किरण डोकले यांना दिला. तर सहकार भूषण पुरस्‍कार जुन्नर तालुक्यातील राजुरी गावातील शरदचंद्र पतपेढी आणि सह्याद्री पुरस्कारासाठी भोसरीतील भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज यांना देण्यात आला.

क्षितिज देशमुख यांनी यशवंतराव गीत सादर केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक व पुरस्कर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर साठे यांनी आभार मानले. रंगनाथ गोडगे पाटील, राजेंद्र वाघ, मुकुंद आवटे, अरुण इंगळे, हनुमंत देशमुख, अरुण गराडे, सुरेश कंक आदींनी संयोजन केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.