Pimpri: चक्क, शौचालयाच्या विषयाला मध्यान्ह भोजनाची उपसूचना

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांकडून अनेक विषयांना उपसूचना देण्याचा सपाटा सुरु आहे. यामध्ये अनेक विसंगत विषयांना उपसूचना दिल्या जात आहेत. मात्र आज (सोमवारी) झालेल्या महासभेत तर चक्क शौचालय बांधणीच्या विषयाला विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याची उपसूचना देत एक कोटीच्या खर्चास मान्यता घेतली. विसंगत उपसूचना दिल्याने सत्ताधारी सभाशास्त्राप्रमाणे कामकाज चालवित नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.

  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची तहकूब सभा सोमवारी (दि.4) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीने घातलेला गदारोळ आणि भाजपने गदारोळात सभा रेटून नेत मंजूर केलेले 13 विषय यामुळे ही सभा चांगलीच गाजली. या गदारोळाचा फायदा घेत भाजपने विषय पत्रिकेतील अनेक विषयांना उपसूचना दिल्या. उपसूचनांच्या घाईगडबडीत कोणत्याही विषयाला कसलाही उपसूचना दिल्या आहेत.

महासभेच्या विषय पत्रिकेत केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाष्ट्र अभियान राबविण्यात येत असून, महापालिकेच्या कामगिरीच्या अंमलबजावणीचा आढावा अवलोकनाचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. संतपीठाच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर आसनासमोर गदारोळ करायला सुरुवात करताच, कोणताही विषय वाचन न करता, सूचक अनुमोदनाचे नियम डावलून दोन विषय मंजुर केल्याची घोषणा महापौर जाधव यांनी केली. सभा एक तासासाठी तहकूब केले. सभेच्या कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतरही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच महापौर जाधव यांनी सर्व विषय मंजूर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.