Pimpri: स्थायी समितीत कोणाची लागणार वर्णी?; उद्या होणार सदस्यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड उद्या (बुधवारी)होणा-या महासभेत केली जाणार आहे. स्थायी समितीत कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, समितीत जाण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. स्थायीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये चूरस लागणार आहे. उद्या भाजपच्या ज्या सदस्यांची निवड होईल. त्यातील एकाची सभापतीपदी वर्णी लागणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. यातील गतवर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीला संपणार आहे.

  • सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापुर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारीच्या महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आगामी काळ निवडणुकीचा असल्याने भाजपकडून स्थायी समितीत सदस्य निवडताना गटा-तटाचा समतोल कसा साधला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उद्या भाजपच्या ज्या सदस्यांची निवड होईल. त्यातील एकाची सभापतीपदी वर्णी लागणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कोणत्या नगरसेवकाला संधी देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी गतवर्षी समितीतील दहा आणि अपक्ष एक अशा 11 सदस्यांचे राजीनामे घेतले होते. त्यामुळे यावेळी देखील सर्वच सदस्यांचे राजीनामे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास सभापती निवड झाल्यानंतर त्यांचे राजीनामे मंजूर केले जातील. त्यानंतर पुन्हा पाच नवीन सदस्यांची निवड केली जाऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.