Chinchwad : श्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त पालखी सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या 141व्या प्रगटदिनानिमित्त तानाजीनगर चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (दि.19) श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक गजानन महाराज मंदीर ते चिंचवडगाव परिसरातून काढण्यात आली.

अश्वपुजन संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे व प्रताप भगत व पादुका पुजन अविनाश बारकांडे, गजानन खासनिस यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी मार्गावर महिला भगिनींनी फुलांच्या पाकळ्यांची सुंदर रांगोळी घालून स्वागत केले. पालखीपुढे ध्वज पथक, बॅंड पथक, वारकरी पथक, भजनी मंडळ सहभागी झाले होते.

  • मंगळवारी पहाटे 5.30 वाजता श्रींना उष्णोदक अभिषेक व अभ्यंगस्नान, श्रींच्या उत्सव मुर्तीचे पुजन व मंगलस्नान सोहळा सकाळी 7 वाजता कलश पुजन आदी कार्यक्रम झाले. दुपारी तुळजाई व अशोका महिला भजनी मंडळ यांनी भजन सादर केले. झुंजार युवक मंडळ, शिवाजी उदय मंडळ, काकडे पार्क, केशवनगर शाळा, साईबाबा मंदीर, मारुती मंदीर, श्री मंगलमुर्ती वाडा, धनेश्वर मंदीर, श्री मोरया गोसावी समाधी मंदीर, गांधी पेठ, चापेकर चौक, पॉवर हाऊस चौक, लिंक रोड, कालीका माता मंदीर या पालखी मार्गावर शेकडों भक्तगणांनी पालखी दर्शन घेतले. सायंकाळी मंदीरात श्रींची महाआरती करण्यात आली.

या उत्सवात बुधवार (दि. 20) व गुरुवारी (दि. 21) सायंकाळी 6 वाजता ह.भ.प. केशव शिवडेकर (गोवा) यांचे किर्तन होणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता डॉ. सजंय उपाध्ये (पुणे); शनिवारी (दि. 23) ह.भ.प. प्रा. विलास गरवारे (सातारा); रविवार (दि. 24) पहाटे 5.30 अखंड चोविस तास पारायण, सोमवारी (दि. 25) सकाळी 9 वाजता ह.भ.प. अनंत महाराज शास्त्री दैठणकर (परभणी) यांचे किर्तन. दुपारी 11.45 वाजता श्रींची प्रगटवेळ व गजर, दुपारी 12 वाजता श्रींची महाआरती नंतर सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसाद, रात्री 10.30 वाजता पसायदानाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

  • कार्यक्रमांच्या आयोजनात श्री गजानन सत्संग मंडळांचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह प्रताप भगत, सहकार्यवाह श्रीपाद जोशी, खजिनदार विष्णू पूर्णये, सहखजिनदार दत्तात्रय सावकार, सल्लागार रमाकांत सातपुते, श्रीकांत अणावकर, सभासद बाळकुष्ण मराठे, संजय खलाटे, देविदास कुलथे व गजानन भक्तगण व सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.