Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये होणार संतांच्या जीवनकार्याची ओळख

शुक्रवारपासून तळेगावात स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज- समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवार (दि. २२) पासून तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेमध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व संत तुकाराम अशा तीन संताच्या जीवनकार्याची ओळख मावळवासीयांना करून दिली जाणार आहे. व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे.

महाराष्ट्राची भूमी संत महात्म्यांची आहे. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी तरूणांमध्ये सर्वधर्मसमभाव हे मूल्य रूजणे आजच्या काळात गरजेचे आहे. तरूण पिढीला सदविचार व सद्गुणांचा अंगीकार करण्यासाठी आपल्या राष्ट्रात होऊन गेलेल्या संताची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. या हेतूने समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम अशा तीन संताच्या जीवनकार्याची ओळख स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे.

या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवार (दि. 22) रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे अध्यक्ष हभप डाॅ अभय टिळक गुंफणार असून संत ज्ञानेश्वर या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे (विश्वस्त, श्री विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे) उपस्थित राहणार आहेत.

या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवार (दि 23) रोजी संत नामदेव या विषयावर हभप चंद्रकांतमहाराज वांजळे आपले विचार व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक दीपक बिचे उपस्थित राहणार आहेत.

या व्याख्यानमालेचे तिसरे आणि अखेरचे पुष्प रविवार (दि 24) रोजी हभप नितीनमहाराज काकडे हे संत तुकाराम या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप बाळासाहेब आनंदराव काशिद अध्यक्ष, भंडारा डोंगर दशमी समिती. असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कलापिनी सांस्कृतिक भवनचे मुख्य विश्वस्त डाॅ अनंत परांजपे उपस्थित राहणार आहेत.

ही व्याख्यानमाला दररोज संध्याकाळी सहा वाजता कलापिनी सांस्कृतिक भवन, तळेगाव स्टेशन रोड, तळेगाव दाभाडे इथे होणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ घेऊन संताचे समाजकार्य जाणून घ्या असे आवाहन रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे तसेच समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी केले आहे.

या व्याख्यानमालेच्या संयोजनासाठी समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे कैलास काळे (उपाध्यक्ष), रजनीगंधा खांडगे (सचिव), मिलिंद शेलार (खजिनदार), श्रीमती कुसुम वाळुंज (सहसचिव), बाळासाहेब शिंदे (प्रकल्प प्रमुख), लक्ष्मण मखर (सहप्रकल्प प्रमुख) तसेच रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे रो गणेश काकडे (उपाध्यक्ष), रो शंकर हादिमणी (अध्यक्ष), रो सुनील खोल्लम (खजिनदार), रो विन्सेंट सालेर (सचिव), रो सुमती निलवे (कार्याध्यक्ष/ प्रकल्प प्रमुख), रो दशरथ जांभुळकर (सहप्रकल्प प्रमुख) यांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.