Pimpri : स्मार्ट सिटींसाठी कमी किंमतीत टिकाऊ कॉंक्रिट आवश्यक – ए.एम.फुलंबरकर

एमपीसी न्यूज – वेगाने शहरीकरण वाढणा-या विकसनशील भारतात सर्व कुटुंबाना पक्की घरे मिळावित यासाठी कमी वेळेत, कमी खर्चात घरे बांधण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे. स्मार्ट शहरांसाठी पायाभूत सुविधा, दळणवळणासाठी प्रशस्त रस्ते, उत्तुंग इमारती उभाराव्या लागतील. यावेळी कॉंक्रिटचा वापर जास्त होईल. त्यासाठी कमी किंमतीत टिकाऊ कॉंक्रिट बनविणे आवश्यक आहे. यासाठी नव अभियंत्यांनी संशोधन करावे म्हणून पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देते. भविष्यात यातूनच शेकडो रोजगार व उद्योजक उभे राहतील. विकसनशील भारत विकसित देश म्हणून उदयाला येईल. असा आशावाद पीसीसीओईचे प्राचार्य ए.एम.फुलंबरकर यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पीसीसीओई महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, क्वॉलिटी सर्कल फॉरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विदयमाने ‘फ्युचर ऑफ कॉंक्रीट टेक्नॉलॉजी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी.जी.शिर्के कंपनीचे कार्यकारी अधिकारी आर.बी.सूर्यवंशी, क्लॉलिटी सर्कलचे अध्यक्ष एस.जे. काळोखे, जलवर्धिनी प्रतिष्ठानचे यु.एम.परांजपे, विभाग प्रमुख एस.टी माळी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काळोखे म्हणाले की, इतर उद्योग व्यवसायाच्या तुलनेत बांधकाम व्यवसायात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जास्त रोजगार निर्माण होतो. त्यातून सरकारला मुबलक महसूल मिळतो. देशाची अर्थव्यवस्था बहुतांशी या व्यवसायावर अवलंबून आहे. यात कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. कमी जागेत उत्तम सुरक्षा व्यवस्था देऊन पर्यावरण पूरक घरे उभारणे हे आव्हान नव अभियंत्यांनी स्वीकारले पाहिजे असे काळोखे म्हणाले. यु.एम.परांजपे यांनी यावेळी फेरोसिमेंट तंत्राचा वापर करुन बनविलेल्या पाण्याच्या टाकीचे प्रात्यक्षिक दाखविले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत प्रा. एस.बी गोरडे, सूत्रसंचालन अजय गायकवाड आणि आभार प्रा.सिध्दार्थ गायकवाड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.