Pimpri:सेवानिवृत्ती नंतरही ग्रेड-पे साठी पोलीस कर्मचा-याच्या पोलीस कार्यालयात आभासी चकरा

एमपीसी न्यूज – पोलीस नाईक म्हणून पोलीस दलात दाखल होऊन पदोन्नतीच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस फौजदार पदापर्यंत पोहोचलेल्या एका पोलीस कर्मचा-याचे नऊ वर्षांचे ग्रेड पे सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील खात्यावर जमा होईना. यामुळे संबंधित पोलीस कर्मचा-याला प्रवासाच्या अडचणींमुळे पोलीस कार्यालयात वारंवार प्रत्यक्ष न येता मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करावा लागत आहे.

लक्ष्मण मन्नू राठोड हे पोलीस नाईक म्हणून पोलीस दलात आले. 2007 साली त्यांना पोलीस हवालदार तर 2014 साली सहाय्यक पोलीस फौजदार म्हणून पदोन्नती मिळाली. पदोन्नतीच्या वेळी वेतनात झालेली वाढ केवळ कागदोपत्री झाली. वाढीव ग्रेड-पे राठोड यांच्या खात्यात मागील नऊ वर्षांपासून जमा झालेच नाही. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचा-यांशी विचारणा केली असता कर्मचारी व अधिकारी वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी राठोड यांचे ग्रेड पे जमा करण्याविषयी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना सांगितले. मात्र वरिष्ठ अधिका-यांच्या सांगण्याचा देखील परिणाम कर्मचा-यांच्या कामावर झाला नाही. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्हाट्स अप, स्पीड पोस्टाच्या माध्यमातून संबंधितांकडे पाठवली आहेत, असे राठोड यांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, “लक्ष्मण राठोड यांना त्यांच्या सेवाकाळात दंड झाला आहे. त्यातील परतावा त्यांच्याकडून झाली नाही. याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी आणि पोलीस दलाच्या चौकशीला सामोरे गेले नाहीत. सेवानिवृत्तीनंतर ते त्यांच्या गावी गेले. ते तिथून केवळ फोनवर चौकशी करत आहेत. त्यांना स्वतः  समक्ष येण्यास सांगितले असताना देखील , ते अद्याप हजर झाले नाहीत. काही अडचणी आहेत. पण त्यातूनही योग्य न्याय करण्याची भूमिका घेतली जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.