Talegaon News : कर्करुग्णाला न्याय मिळवून देण्यात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – दुर्धर अशा कर्करोगाशी झुंज देत असताना उपचारांसाठी आपल्या आयुष्यभराची 41 लाख रुपयांची पुंजी परत मिळवून द्यावी, या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथील एका रुग्णाने माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे साकडे घातले आहे. याप्रकरणी प्रवीण दरेकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र देत या प्रकरणी योग्य कार्यवाही करून कळविण्यास सांगितले आहे. नऊ वर्षांपासून सुरु असलेल्या या लढ्याला माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या प्रयत्नांमुळे यश आले आहे.

अरुण बाजीराव गडदे (रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे, तळेगाव दाभाडे) यांनी प्रवीण दरेकर यांना साकडे घातले होते. गडदे यांच्या समवेत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक तसेच गडदे यांचे पुत्र सागर गडदे व भाचे संतोष काटे, मीरा काटे उपस्थित होते.

मुंबई येथील मंगलमूर्ती एन्टरप्रायझेसचे मालक प्रकाश जनार्दन लामगे यांच्या विरोधातील पाच वर्षांपूर्वी दाखल झालेल्या फसवणूक आणि मोफा कायद्या अंतर्गत गुन्ह्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच आपले 41 लाख रुपये परत मिळवून देऊन जीवनाची लढाई जगण्यासाठी मदत करावी, अशी कळकळीची विनंती गडदे यांनी निवेदनात केली आहे.

गडदे यांनी नऊ वर्षांपूर्वी मुंबई येथील विकासक प्रकाश जनार्दन लामगे यांच्याशी फ्लॅट खरेदीबाबत रीतसर आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र अद्यापही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. मुंबईत खेतवाडी सातवी गल्ली, खेमराज श्री कृष्णदास मार्ग, गिरगाव डिव्हिजन येथील प्लॉट क्रमांक 826 येथील अरब बिल्डिंगमध्ये 400 चौरसफूट क्षेत्रफळाचा फ्लॅट खरेदीसाठी 41 लाख रुपयांचा व्यवहार करून तसा नोंदणीकृत करार केला. ठरल्याप्रमाणे गडदे यांनी सर्व रक्कम धनादेशांद्वारे बिल्डरला देऊ केली. अद्यापही प्रकाश लामगे यांनी अरुण गडदे यांना फ्लॅटचा ताबा दिलेला नाही.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्रॉफर्ड मार्केट येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाकडे प्रकाश लामगे यांच्या विरुद्ध 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बांधकाम सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतर 30 महिन्यांच्या आत तयार झालेल्या फ्लॅटचा शांततामय मार्गाने ताबा देण्याचे लामगे यांनी मान्य केले. विक्रेता या करारनाम्याचे पालन करण्यात अयशस्वी झाला तर 15 दिवसांची नोटीस देऊन टोकन म्हणून घेतलेली रक्कम 12 टक्के वार्षिक व्याजाने खरेदीदाराला परत करेल, असे करारनाम्यात नमूद करण्यात आले आहे, मात्र या करारनाम्यात अटी आणि शर्तींचे पालन बिल्डरने केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर खरेदीदार यांनी गुन्हा दाखल केला. या घटनेस जवळपास नऊ वर्षे होऊन गेली मात्र अद्यापही खरेदीदार यांना त्यांची रक्कम व्याजासह मिळलेली नाही, असे गडदे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सद्यस्थितीत या मिळकतीच्या विकासनाचे काम भगवान पालव अँड सन्स हे विकसक करीत आहेत, मात्र ते लामगे यांना घेऊन येण्यास सांगत आहेत. लामगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिन्यातच गडदे यांना कर्करोगाचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत ते तळेगाव दाभाडे येथे राहावयास आहे. कर्करोगावरील उपचारांमुळे त्यांना प्रवास करणेही शक्य नाही. त्यामुळे लामगे यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास स्थानिक तळेगाव पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्याचा आदेश संबंधितांना द्यावा, अशी मागणी गडदे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

लामगे यांनी केलेल्या फसवणुकीमुळे आपले जगणे असह्य झाले आहे. आपल्याला उदरनिर्वाहासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी पैशाची नितांत गरज आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी कळकळीची विनंती गडदे यांनी निवेदनात केली आहे. या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दरेकर यांनी दिले आहे. पोलीस महासंचालक व मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून तातडीने संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याची सूचना देखील दरेकर यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांचे पत्र पोलीस उप आयुक्त कार्यालयातून व्हीपी रोड पोलीस ठाण्यात गेले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी गडदे यांची पूर्ण बाजू ऐकून घेतली आहे. याप्रकरणी लामगे यांना देखील सोमवार पर्यंत बाजू मांडण्याची मुभा पोलिसांनी दिली आहे. दोन्ही बाजू ऐकून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी दिले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी या प्रकरणाचा मागील एक महिन्यापासून पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला. गडदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी मंत्रालयासमोर आंदोलन देखील करण्याचा इशारा प्रदीप नाईक यांनी दिला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हे प्रकरण गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.