Punawale : पुनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांचे चिपको आंदोलन

एमपीसी न्यूज – पुनावळे येथे प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विरोधात (Punawale)पुनावळे, मारुंजी, ताथवडे, जांबे, हिंजवडी, वाकड आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी रविवारी (दि. 5) सकाळी बाईक रॅली काढली. यानंतर प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन नागरिकांनी चिपको आंदोलन केले.  हा प्रकल्प जंगल तोडून उभारण्यात येणार असल्याने इथली नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होईल, तसेच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनावळे मधील काटेवस्ती येथे (Punawale)असलेल्या जंगल परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. वनविभागाची 26 हेक्टर जागा पालिकेला मिळाली असून सन 2008 मध्ये या जागेवर कचरा डेपोसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. मोशी येथील कचरा डेपो भरल्याने पालिकेने कचरा डेपोसाठी ही पर्यायी सोय केली आहे. मात्र या प्रस्तावित कचरा डेपोच्या आजूबाजूला पूर्णपणे नागरी वस्ती झाली आहे. दाट लोकवस्ती असल्याने इथे कचरा डेपो करू नये, अशी पुनावळे, ताथवडे, मारुंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे.
Pune : चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा – सुप्रिया सुळे

याच मागणीसाठी पिंपरी चिंचवड को ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन आणि पुनावळे रेसिडेंट्स एसोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी बाईक रॅली काढण्यात आली.  पुनावळे आमच्या हक्काचं-नाही कुणाच्या बापाचं, कचरा डेपो हटाव-पुनावळे बचाव, कचरा डेपो हटवा-पुनावळे वाचवा, अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला.

18 लॅटीट्यूड मॉल पुनावळे येथून या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली पुढे कोयते वस्ती, शिंदे वस्ती, लाईफ रिपब्लिक सोसायटी मारुंजी, लक्ष्मी चौक, भूमकर चौक, ताथवडे सर्व्हिस रोड, पुनावळे, कोयते वस्ती मार्गे काटे वस्ती येथील जंगल परीसरात आली. जंगलातील प्रत्येक झाडाला आलिंगन देत नागरिकांनी चिपको आंदोलन केले. कचरा डेपो करण्यासाठी झाडे तोडावी लागणार. त्यामुळे इथल्या निसर्गाचा ऱ्हास होणार असल्याने हा विरोध करण्यात आला.

पालिकेने सन 2008 साली या जागेवर कचरा डेपोसाठी आरक्षण टाकले. मात्र त्यावेळी या परिसरात नागरीकरण झालेले नव्हते. आता प्रस्तावित कचरा डेपोच्या आजूबाजूच्या परिसरात लाखो नागरिक वास्तव्यास आले आहेत. प्रस्तावित कचरा डेपोपासून काही मीटर अंतरापर्यंत सोसायट्या झाल्या आहेत. त्यामुळे इथे कचरा डेपो सुरु झाल्यास इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.