Pune : सरकारवर आता विश्वास राहिला नाही; आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – धनगर आरक्षणासाठी बारामती येथे झालेल्या आंदोलनादरम्यान भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु भाजप सत्तेत येऊन चार वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही अद्यापही या समाजाला आरक्षण मिळाले नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आजपासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती धनगर समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत देण्यात आली.

पुण्यातील घोले रोडवरील जवाहरलाल नेहरू सभागृहात धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी माजी आमदार प्रकाश शेडगे, जेष्ठ नेते अण्णा डांगे, आ रामहरी रूपनवर, आ राम वडकूते, आ दत्तामामा भरणे, पुणे जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकते यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

राज्यकर्त्यांनी धनगर समाजाचा उल्लेख धनगड केल्यामुळे संपूर्ण समाज उध्वस्त झाला आहे. धनगर आणि धनगड एकच असल्याचे अनेक पुरावे वेळोवेळी सादर करण्यात आले आहेत. परंतु राज्य सरकार अद्यापही हे मानायला तयार नाही. राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लगेच सोडवू शकते, पण ते वेळकाढूपणा करत आहेत. या समाजाचा आता सरकारवर विश्वास राहिला नाही. आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचे असेल. आणि याला पूर्णतः सरकार जबाबदार असेल. असा इशारा या बैठकीवेळी देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.