Pimpri: महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यास उरले तीन तास; राजकीय हालचालींना वेग

महापौरपदासाठी राहुल जाधव यांचे नाव निश्चित?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन तास उरले आहेत. आज (मंगळवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. अवघे तीन तास शिल्लक असल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, महापौरपदासाठी भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव यांचे नाव निश्चित झाले असल्याचे, विश्वसनीय वृत्त आहे. उपमहापौरपद पिंपरी किंवा चिंचवड मतदार संघातील नगरसेवकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस देखील महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहे.

पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून कुणबी म्हणून निवडून आलेले च-होलीचे नगरसेवक नितीन काळजे यांची महापौरपदावर वर्णी लागली होती. सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुस-या सव्वा वर्षाचे महापौरपद मिळण्यासाठी सत्ताधारी पक्षातील ‘ओबीसी’ नगरेसवकांनी ताकद पणाला लावली आहे.

भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव, चिंचवड मतदार संघातील नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नामदेव ढाके यांच्यात महापौरपदासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड मतदार संघात असून सभागृह नेतेपद निष्ठावान गटाकडे आहे. त्यामुळे महापौरपद भोसरीकरांकडे कायम राहण्याची दाट शक्यता असून भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित झाले असल्याचे, विश्वसनिय वृत्त आहे. तर, उपमहापौर पदासाठी नगरसेवकांची पसंती दिसून येत नाही. पिंपरी किंवा चिंचवड मतदार संघात उपमहापौरपद राहण्याची शक्यता आहे.

दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय हालचालींना अतिशय वेग आला आहे. नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून कोणाचे उमेदवारी अर्ज दाखल केला जातो, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

दरम्यान, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस देखील महापौर, उपमहापौरपदासाठी आपले उमेदवार उभा करणार आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील अर्ज दाखल करणार आहेत. 36 नगरसेवक असलेली राष्ट्रवादी काँग्रेस महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध होऊ दिली नव्हती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.