Pune: संस्कृत कार्यशाळेमध्ये संस्कृतचा वापरावर भर देण्याचे आवाहन – दत्ता काळे 

एमपीसी न्यूज – पूर्वी आपल्या घरात त्रिकाळ पूजा संपन्न होत(Pune) असे पण बदलत्या काळानुसार ती केवळ सकाळी होते. पूर्वी 16 उपचार होत असत. आता वेळ अभावी ती पंचोपचार पूजा झाली आहे. या संस्कृत कार्यशाळेमुळे घराघरातून कोणत्या ना कोणत्या कारणांनी लुप्त होत चाललेल्या भारतीय संस्कारांचे जतन केले जाईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिंहगड भागाचे सहकार्यवाह दत्ता काळे यांनी व्यक्त केला. 
संस्कृत भारतीच्या सिंहगड जनपदाने आयोजित केलेल्या दोन (Pune)दिवसांच्या दैनिक षोडशोपचार कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. अभिरूची परिसरातील मधुमालती सभागृहात ही दोन दिवसांची नि:शुल्क कार्यशाळा झाली, त्यात सिंहगड जनपदामधील सत्तर जणांनी सहभाग घेतला होता. यात दैनिक पूजाविधी, मंत्रोच्चारण, १६ संस्कार, पंचांग वाचन,  रामरक्षा आदी स्तोस्त्रांचे शुद्ध पठण आणि संस्कृत भाषा याविषयी मार्गदर्शन कऱण्यात आले.
दत्ता काळे पुढे म्हणाले की, संस्कृतमधील श्लोक आपण म्हणतो पण त्याचा अर्थ समजावून घेत नसल्यानेच आपण संस्कृतचा भाषा म्हणून विचार करतच नाही. घरात दैनंदिन पूजा अर्चा होत असल्याने घरात श्लोकपठण होते. त्यातून सकारात्मक उर्जा घरात रहाते आणि याचे चांगले परिणाम कुटुंबावर व पुढील पिढीवर होत असतात. या कार्यशाळेचा उपयोग कुटुंबात संवाद वाढण्यासाठी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सध्या जगात ग्रग्रियन कँलेंडर सर्वत्र वापरले जाते. ग्रेगरी हे पोप होते. बायबल अनुसार ईसा पूर्व 4002 वर्षांपूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली असे ते मानतात. भारतीय कालगणने प्रमाणे कलियुगाला सुरुवात होऊन 5125 वेळ वर्ष सुरू आहे. कृष्ण द्वापर युगात व राम त्रेतायुगात जन्मले. आपली कालगणना ब्रह्माडाच्या उत्पत्तीपासून सुरू झाली आहे. या कालगणनेत भारतीय सनातन राष्ट्राचा इतिहास लिहिणे शक्य आहे. म्हणून सगळ्यांनी प्रतिदिन व्यवहारात ह्याच कालगणनेचा उपयोग व प्रचार करावा, असे संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्रीश देवपुजारी यांनी आपल्या भाषणात आवाहन केले.
कार्यशाळेच्या मुख्य संयोजिका वैखरी कुलकर्णी यांनी सांगितले की या दोन दिवसांच्या कार्यशाळेत नित्य पूजा करणारे सिंहगड जनपदात राहणारे पुरुष व महिला संस्कृतभारतीच्या आयोजनात सहभागी होऊन नि:शुल्क षोडशोपचार पूजा शिकले. या कार्यशाळेमुळे काही घरांमध्ये शास्त्रोक्त पूजा सुरु होईल व त्याचे अनुकरण नवीन पिढी करेल. प्रत्यक्ष पूजा करवून घेतल्याने अनेकांचे शंका निरसन झाले, असे त्या म्हणाल्या.

घरातील मोठ्या माणसांचे उच्चारण शुद्ध झाले तर लहाने ते ऐकून शुद्ध उच्चारतील हे लक्षात घेऊन संस्कृतभारतीचे पश्चिम महाराष्ट्राचे सह प्रान्त मंत्री श्री. मोरेश्वर देवधर यांनी उच्चारणाचे सत्र घेतले. त्यात रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष व मंत्रपुष्पांजली यांचा समावेश होता. उच्चारणाचे नियम सांगितल्यामुळे भाग घेणाऱ्या सर्वांना नव्याने वर्णमाला शिकण्याचा अनुभव आला. देवधरांनी षोडशोपचार पूजा सर्वांकडून करवून घेतली.
पुण्यातले पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी कालगणना, पंचांग वाचन व ज्योतिषशास्त्र यावर उत्तम प्रकाश टाकला. सिद्धांत, संहिता व होरा हे तीन भाग मिळून ज्योतिषशास्त्र बनले आहे व नित्य पूजा करते वेळी पञ्चाङ्ग वाचन कसे आवश्यक आहे हे त्यांनी शास्त्राच्या आधारे समजावून सांगितले.
संस्कृतभारतीच्या कार्याचा परिचय आनन्द माहोरे यांनी करून दिला. उद्बोधन सोडून कार्यक्रमाचे संचालन, गीत, सूचना इत्यादी संस्कृतमध्ये केल्याने कार्यशाळेत संस्कृत वातावरण निर्माण झाले. अनेकांनी स्वतःचा परिचय करून देतांना संस्कृत शिकण्याची इच्छा प्रकट केली व संस्कृतच्या कामासाठी वेळ देण्याचा संकल्प केला.
कार्यशाळेचे उदघाटन न्याय व मीमांसा या दोन शास्त्राचे युवविद्वान राजेश्वर देशमुख यांनी केले. प्रास्ताविक जनपदाच्या मंत्री वैखरी कुलकर्णी यांनी केले. कार्यशाळेची संकल्पना संस्कृतभारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्रीश देवपुजारी यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.