Pune : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त धनादेश वितरण व वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे प्रादेशिक विभागातील पुणे जिल्हा कार्यालयामार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशांचे वितरण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते पार पडला.

येरवडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील या कार्यक्रमात पुणे जिल्हा कार्यालयांतर्गत बीजभांडवल योजनेंतर्गत 03 व अनुदान योजनेंतर्गत 01 (एक) लाभार्थीस महामंडळामार्फत बँकांनी मंजूर केलेल्या 10 लाख 50 हजार कर्जापैकी महामंडळाचे बीजभांडवल एक लाख 70 हजार व अनुदान 40 हजार रुपये प्राथिनिधीक स्वरुपात महामंडळाचे अध्यक्ष गोरखे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार होते. कार्यक्रमास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दि. खं. खुडे, जिल्हा व्यवस्थापक शि. लिं. मांजरे, समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे, हरेश्वर डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप अवघडे, सुनील बेजगमवार, राजेश राजगे, सागर गायकवाड, दीपक चकाले यांच्यासह इतर कार्यकर्ते, लाभार्थी उपस्थित होते.

अमित गोरखे म्हणाले, “महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन लाभार्थीनी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करुन अन्य समाजबांधवांना अर्थसहाय्य करण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्यावी. घेतलेल्या कर्जाचा योग्यविनियोग करुन, स्वत:ची आर्थिक, सामाजिक पत सुधारावी. महामंडळ वेगवेगळ्या महामंडळाच्या चांगल्या योजना भविष्यामध्ये राबविण्यार येणार आहेत. महामंडळामार्फत तळागाळातल्या समाजापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याकरिता अधिकारी, कर्मचा-यांनी जोमाने काम करुन अनुसूचित जातीतील मातंग समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्नशिल रहावे”

महामंडळाचे कामकाज ऑनलाईन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची बंद पडलेली वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. तसेच, पुढे कामकाज ऑनलाईन करणार असल्याची घोषणाही यावेळी गोरखे यांनी केली. तसेच, शासनाकडून महामंडळास लवकरच आवश्यक तेवढा निधी पुरविण्यात येत आहेत. अन्य बंद असलेल्या महामंडळाच्या योजनाही लवकरच सुरु करीत आहोत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.