Pune : लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या फरार आरोपीस अटक

एमपीसी न्यूज- लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या व गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 वर्षांपासून फरार असणा-या आरोपीस पोलिसांनी काल बुधवारी(दि.14) अप्पर इंदिरानगर येथील राममंदिराजवळील त्याच्या राहत्या घराजवळ अटक केली.

कार्तिक ऊर्फ काळू दिवटे(रा.लोहीयानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल बुधवारी बिबवेवाडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना बातमीदाराकडून तीन वर्षांपासून फरार आरोपी कार्तिक हा अप्पर इंदिरानगर येथील राममंदिराजवळ आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस तेथे गेले असता त्यांना कार्तिक हा राममंदीराजवळ असलेल्या त्याच्या घराजवळ उभा असलेला दिसला.

पोलीसांनी कार्तिकला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने 2015 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे लग्नासाठी अपहरण केल्याचे कबूल केले. व याप्रकरणी त्याच्यावर खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्यामुळे तो फरार होता हे देखील कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणाची खात्री केली असता कार्तिक हा फरारी आरोपींच्या यादीत समाविष्ठ असल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी कार्तिकला पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई खडक पोलीस करत आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्युल्लता चव्हाण, पोलीस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, विल्सन डिसूझा, शंकर पाटील, सचिन गायकवाड, योगेश जगताप यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.