Pune : पुणे परिमंडलात वीजबिल भरण्यासाठी साडेनऊ लाख वीजग्राहक ‘ऑनलाईन’

89

एमपीसी न्यूज  –  ‘ऑनलाईन’ सेवेद्वारे महावितरणचे वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या पुणे परिमंडलामध्ये 9 लाख 52 हजारांवर गेली आहे. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात या वीजग्राहकांनी 176 कोटी 94 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे.

राज्यात सद्यस्थितीत सुमारे 45 लाख लघुदाब वीजग्राहक वीजबिलांचा दरमहा ‘ऑनलाईन’ भरणा करीत आहेत. यामध्ये पुणे परिमंडलातील 9 लाख 50 हजार वीजग्राहकांची संख्या ही सर्वाधिक असून त्यानंतर भांडूप व कल्याण परिमंडलात सुमारे पावणेसात ते सात लाख वीजग्राहक वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करीत आहेत.

वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध झाली आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे. महावितरणकडून ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यासाठी विविध उपक्रमांतून ग्राहकांना सातत्याने माहिती देण्यात येत आहे. गेल्या ऑगस्ट 2018 मध्ये पुणे शहरातील 5 लाख 64 हजार वीजग्राहकांनी 100 कोटी 41 लाख, पिंपरी चिंचवड शहरातील 2 लाख 71 हजार वीजग्राहकांनी 51 कोटी तसेच मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यातील 1 लाख 17 हजार वीजग्राहकांनी 25 कोटी 48 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून 2016 पासून मोबाईल अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणे केले आहे.

 ‘ऑनलाईन’ वीजभरणा झाले निःशुल्क

क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे.

HB_POST_24_Oct
HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: