Pune: उष्णतेच्या लाटेत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण, महापारेषणची उच्चस्तरीय बैठक, वीजपुरवठ्यातील व्यत्यय टाळण्यासाठी तांत्रिक कामे सुरू

एमपीसी न्यूज –  यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णते ची प्रचंड लाट सध्या सुरू असल्याने(Pune) विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोबतच वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसत आहे. या परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गुरूवारी (दि. 18) महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली.
तीत प्रामुख्याने लोणीकंद  400केव्ही, एनसीएल 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रावरील वीजभार विभाजित करून तो अन्यत्र वळवणे तसेच पारेषणच्या काही उपकेंद्रातून २२ केव्हीच्या नवीन वितरण वीजवाहिन्यांसाठी उपाययोजना आदी तांत्रिक कामांचे निर्णय घेण्यात आले व त्यासंदर्भात युद्धपातळीवर कामेही सुरू करण्यात आली.
या बैठकीमध्ये महापारेषणच्या विविध उपकेंद्रांमध्ये महावितरणच्या नवीन 22 केव्ही वीजवाहिन्या(Pune) कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करणे आणि पर्यायाने अस्तित्वात असलेल्या वीजवाहिन्यांवरील भार कमी करणे याबाबतचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले. त्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू करण्याचे निर्देश मुख्य अभियंता  राजेंद्र पवार व . अनिल कोलप यांनी दिले. यावेळी महापारेषण व महावितरण चे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, विठ्ठल भूजबळ, जयंत कुलकर्णी, अमित कुलकर्णी तसेच कार्यकारी अभियंत्यांची उपस्थित होते.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात झालेल्या या बैठकीमध्ये मुख्य अभियंता  राजेंद्र पवार (महावितरण) व . अनिल कोलप (महापारेषण) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुणे परिमंडलातील सर्वच १२ विभागनिहाय पारेषण व वितरण यंत्रणेचा आढावा घेण्यात आला व त्यानुसार तांत्रिक उपाययोजनांचे निर्णय घेत भारव्यवस्थापनेतून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभाग पातळीवर 24 x7 समन्वय ठेवण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

पुणे परिमंडलामध्ये सुमारे 3100 मेगावॅट विजेची मागणी आहे. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. पर्यायाने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महापारेषणच्या काही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र व वीजवाहिन्यांवर ताण येत आहे. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भार व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित होत असल्यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी वीजपुरवठा बंद ठेवावा लागत आहे. यासोबतच अवकाळी वादळी पाऊस व गारपीट यामुळे ही पारेषण व वितरण यंत्रणेवर परिणाम होत आहे.

Pune: एमआयएमचे अनिस सुंडके यांची उमेदवारी पराभवाच्या भीतीपोटी, भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र – ऍड. अभय छाजेड
या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडळातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापारेषणच्या लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्रातील काठापूर व आळेफाटा 22  केव्ही वीजवाहिन्यांचा भार हा बाभळेश्वर 400 केव्ही उपकेंद्रावर देण्याचा निर्णय झाला. शुक्रवारी (दि. 19) रात्री उशिरा हे काम पूर्ण होईल.
या उपायामुळे लोणीकंद वरील वीजभार कमी झाल्यामुळे मंचर विभागातील प्रामुख्याने शेतीपंपांसह इतर सर्व ग्राहकांना सुरळीत वीज उपलब्ध होईल. तसेच चाकण व तळेगाव अतिउच्चदाब वीजवाहिन्यांना फायदा होणार आहे. तसेच गणेशखिंड येथील एनसीएल132  केव्ही उपकेंद्रातील काही वीजभार फ्लॅगशिप 220 केव्ही उपकेंद्राकडे वळविण्यात येत आहे. यासोबतच राजगुरुनगर विभागातील तळेगाव, कामशेत, पवना येथील वीज वाहिन्यांना खोपोलीवरून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.