Chinchwad : निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी आजारपणाचे खोटे कारण पोलीस अंमलदाराला पडले महागात

अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले निलंबनाचे आदेश

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश दिले  असताना पोलीस अंमलदाराने (Chinchwad) जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्ताला जाणे टाळले. त्यामुळे संबंधित अंमलदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी याबाबतचे आदेश बुधवारी (दि. 17) दिले आहेत.

भूषण अनिल चिंचोलीकर (नेमणूक- मुख्यालय) असे निलंबित केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयीन आदेशानुसार, 12 एप्रिल ते 21 एप्रिल 2024 या कालावधीसाठी लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 50 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याबाबत आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने या बंदोबस्तासाठी 50 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आलेल्या यादीमध्ये चिंचोलीकर यांचाही समावेश होता.

दरम्यान, 10 एप्रिल रोजी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची मुख्यालयात हजेरी घेतली असता चिंचोलीकर तेथे गैरहजर होते. फोनवरून त्यांनी आजारी असल्याचे मुख्यालयास कळविले. त्यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चिंचोलीकर हे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने औषधोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी आले होते असे सांगितले. तसेच, त्यांना रुग्णालयात दाखल होऊन तपासण्या करण्यास सांगितले होते.

Chinchwad : वर्षभरात तीन पोलिसांचा अपघाती मृत्यू

चिंचोलीकर यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. तसेच, चिंचोलीकर यांना होत असलेला त्रास हा गंभीर स्वरूपाचा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अतिमहत्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केलेली असतानाही जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्त चुकविण्यासाठी चिंचोलीकर गैरहजर राहिले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आदेशाची अवहेलना केली. तसेच कर्तव्यात गंभीर स्वरूपाची चूक असून त्यांचे हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणास्तव चिंचोलीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.