Chinchwad : वर्षभरात तीन पोलिसांचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज – शहरात दररोज होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत ( Chinchwad) आहे. बेशिस्त वाहतूक हे त्याचे महत्वाचे कारण आहे. त्याव्यतिरिक्त खराब रस्ते, वाहतूक कोंडी अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. यात चालकांचा हलगर्जीपणा अनेकांच्या जीवावर बेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मागील वर्षभरात अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अचानक ओढवलेल्या या संकटांमुळे तिन्ही अंमलदारांचा संपूर्ण परिवार कोलमडून गेला आहे.

पहिला अपघात

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार राजेश कौशल्य यांचा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे 2 ऑगस्ट 2023 रोजी रस्ते अपघात झाला. राजेश यांच्या दुचाकीला अचानक कुत्रा अडवा आला. त्याला वाचविताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा अपघात झाला. त्यांनी हेल्मेट घातले होते. मात्र अपघातात त्यांचे हेल्मेट डोक्यावरून निघाले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. रात्री दीड वाजताची वेळ होती. रस्त्याने येणारे जाणारे कुणीही नव्हते. त्यामुळे सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. काही वेळाने तिथून जाणाऱ्या एका पीएमपी बस चालकाच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्या चालकाने एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान 14 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. राजेश यांनी घरफोडीच्या गुन्ह्यात मोठी कामगिरी केली होती. आरोपींना पोलीस ठाण्यात जमा केल्यानंतर रात्री उशिरा ते घरी जात होते. त्यांची कामगिरी जगासमोर येण्यापुर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

दुसरा अपघात

चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार योगेश गणपत ढवळे (वय 40) हे 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास चाकण वाहतूक विभागाच्या कार्यालयात पंचप्राण शपथ घेण्यासाठी जात होते. चाकण मधील एच पी पेट्रोल पंपाजवळ ( Chinchwad) आल्यानंतर ढवळे यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. ढवळे यांनी हेल्मेट घातलेले होते. डंपरची धडक बसल्यानंतर ते रस्त्यावर पडले आणि डंपरच्या मागील चाकाखाली आले. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

तिसरा अपघात

पोलीस हवालदार सचिन नरुटे हे देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 15 एप्रिल 2024 रोजी डे शिफ्ट झाल्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास ते पोलीस ठाण्यातून घरी जाण्यासाठी निघाले. बंगळुरू-मुंबई महामार्गावरून वाकडकडे जात असताना रावेत येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नरुटे यांनी देखील हेल्मेट घातले होते. मात्र अपघात झाल्यानंतर हेल्मेट बाजूला पडले असल्याचे सांगितले जाते.

पेट्रोल, डीझेलचे काही युनिट वाचविण्याच्या नादात वाहन न्युट्रल, बंद करून चालवल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. रस्ते अपघाताच्या बहुतांश घटनांमध्ये अवजड वाहनाच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली येऊन अपघात होणे तसेच डाव्या बाजूला धडक बसून अपघात झाल्याच्या घटना सर्वाधिक आहेत. अवजड वाहनाची डावी बाजू सर्वाधिक ब्लाइंड असते. त्यामुळे डाव्या बाजूला कोणते वाहन आहे याची कल्पना चालकाला राहत नाही. याबाबत चालकांना प्रशिक्षण देता येईल का, याबाबत देखील वाहतूक विभाग अथवा परिवहन विभागाने विचार करणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 24 लाख वाहने

पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ( Chinchwad) मागील वर्षी प्रकाशित केलेल्या अहवालात शहरात एकूण 24 लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी झालेली आहे. या शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. जवळपास त्या प्रत्येकाकडे वाहन आहे. अशा सर्वच वाहनांची शहरात नोंद नाही. त्यामुळे पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारी पेक्षा लाखोंच्या संख्येने अधिक वाहने शहरात आहेत.

वाहतूक पोलिसांकडून उपक्रम

रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून सतत विविध उपक्रम राबवले जातात. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, लहान मुलांना वाहन चालवण्यासाठी देणे, हेल्मेट, सीटबेल्ट न वापरणे, मोबाईल फोनवर बोलत वाहन चालवणे, वाहन प्रवेश बंदी तोडणे, वेग मर्यादा न पाळणे, सायलेन्सर बदलणे अशा अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांकडून कारवाई केली जाते. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा दंड आकारला जातो. शकडो खटले न्यायालयात दाखल केले जातात. पण वाहन चालक सुधारण्याचे नाव घेत नाहीत.

तीन महिन्यात 97 जणांनी गमावला रस्त्यावर जीव

चालू वर्षात गेल्या तीन महिन्यांमध्ये 258 रस्ते अपघात झाले. त्यात 97 जणांनी जीव गमावला. तर 178 जण जखमी झाले आहेत. हे प्रमाण दिवसाला एका व्यक्तीचा मृत्यू एवढे भयंकर ( Chinchwad)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.