Pune : जातींचा विचार न करता महापुरुषांच्या जयंती साजऱ्या व्हाव्यात -जांबुवंत मनोहर

शिवजन्मोत्सव सोहळ्यात सम्यक पुरस्काराने सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव; अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती'चा उपक्रम

एमपीसी न्यूज – ‘आपल्या जातीच्या महापुरुषांचे पूजन केले पाहिजे. या समजुतीतून सर्व समाज समूहांना बाहेर आणले पाहिजे. अन्य समाज समूहांनी दुसऱ्या समाज समूहाच्या महापुरुषाचे पूजन केले तर ती महापुरुषांची पळवा पळवी न मानता, महापुरुषांच्या विचारांचा विस्तार आणि प्रसार होत आहे, असे मानले पाहिजे. जातींचा विचार न करता महापुरुषांच्या जयंती साजऱ्या व्हाव्यात, असे प्रतिपादन जांबुवंत मनोहर यांनी केले.

सत्यशोधक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती व राजमाता जिजाऊ शिवजन्मोत्सव समितीतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांना सम्यक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध महापुरुषांच्या, महान व्यक्तीमत्वांच्या जयंती सोहळ्यांचे आयोजन वर्षभर केले जात आहे. त्यातून १०० सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याचा संकल्प समितीने केलेला आहे. शिव्जान्मोत्सव सोहळ्यात सम्यक पुरस्कार वितरण हा या उपक्रमाचा एक भाग होता. यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल उर्फ यादवराव सोनवणे, वसंतराव साळवे,दीपक गायकवाड,नागेश भोसले,अमोल काशीद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर होते.

अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, सचिन पांडूळे ,प्रभाकर कोंढाळकर, हनुमंत साठे, मारूती कांबळे, कैलास पवार, बालाजी वाईकर, प्रदीप ओव्हाळ,मनोज अल्हाट,राजू धडे यांच्यासहित २० कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

संतोष संखद यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक आनंद वैराट यांनी केले. नागेश भोसले यांनी आभार मानले. गुरुवारी (दि. २० फेब्रुवारी २०२० रोजी) ७ वाजता राष्ट्र सेवा दल, निळु फुले कलामंच, साने गुरुजी स्मारक, दांडेकर पूल येथे हा कार्यक्रम झाला.मिलिंद अहिरे ,संदीप बर्वे,रमेश राक्षे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना ही लोकशाहीचे प्रारूप होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तेच प्रारूप संविधानाच्या रूपात आणले आणि अण्णा भाऊ साठे यांनी त्याचे गुणगान शाहिरीतून केले. महापुरुषांचा हा एकसंध प्रवाह आपण ध्यानात घेतला पाहिजे . सर्व महापुरुषांच्या जयंती सर्व समुदायानी एकत्र येऊन साजऱ्या करायच्या,ही अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीची संकल्पना पथदर्शक असून त्याचा राज्यभर विस्तार झाला पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.