Pune : नवोदित कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देणे हीच डॉ. श्रीराम लागू यांना खरी श्रद्धांजली

पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांची भावना

एमपीसी न्यूज – पुणे शहरात अनेक नवोदित कलावंत आहेत. ज्यांना कधी संधीच मिळत नाही. त्यांना नियमितपणे सराव करता यावा यासाठी, व्यासपीठ निर्माण करून एकादे केंद्र निर्माण करणे, हीच ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना खरी श्रद्धांजली असेल, अशी भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी बोलून दाखविली. देसाई बंधू आंबेवालेचे मालक वसंतराव देसाई यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

अभिनयाच्या क्षेत्रापमाणेच डॉ. लागू माणूस म्हणूनही मोठे होते. त्यांच्या निधनाने कला-साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, लागू यांनी विविध विषयांवर परखड भूमिका मांडली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. ते पुणेकर म्हणून जाण्याने दुःख झाले. तसेच, व्यावसायिक वसंतराव देसाई यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे काम असल्याचेही महापौर यांनी सांगितले.

समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच डॉ. श्रीराम लागू यांचेही कार्य होते. नाटक, चित्रपटात त्यांची भूमिका जिवंतपणाची वाटायची. त्यांचे स्मारक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली. नटसम्राट, सामना, पिंजरा, सिंहासन, या चित्रपटांमुळे लागू यांची कारकीर्द बहरली. त्याचप्रमाणे माझ्या राजकीय जीवनात वसंतराव देसाई यांचाही वाटा होता. या दोघांच्याही जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.

पुणे महापालिकेतर्फे व्यासपीठ निर्माण करून, नवोदित कलावंतांना सराव करण्यासाठी एकादे केंद्र उभारणे, हीच लागू यांना श्रद्धांजली ठरणार असल्याचे सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक जयंत भावे, महेंद्र पठारे, नगरसेविका नंदा लोणकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक अविनाश साळवे यांनीही लागू यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, लागू आणि देसाई यांच्या निधनामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.