Pune Crime News : मनेका गांधींच्या तक्रारीनंतर पुण्यात डांबून ठेवलेल्या 12 श्वानांची सुटका

एमपीसी न्यूज – पीपल्स फॉर एनिमल संघटनेच्या अध्यक्षा मनेका गांधी यांनी तक्रार केल्यानंतर पुण्यातील लोणीकंद परिसरात डांबून ठेवण्यात आलेल्या तब्बल बारा श्वानांची सुटका करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने हे श्वान पुढील देखभालीसाठी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या ताब्यात स्वप्नात येणार आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लोणीकंद परिसरात बारा श्वानांना डांबून ठेवून क्रूररीत्या त्यांची देखभाल होत असल्याची तक्रार मनेका गांधी यांनी केली होती. पीपल फॉर ॲनिमल संघटनेच्या पुण्यातील पदाधिकारी पुनीता खन्ना यांनी लोणीकंद पोलिसांच्या मदतीने या श्वानांची सुटका केली होती. मरणासन्न अवस्थेत असलेल्या या सर्वांची अतिशय क्रूररित्या देखभाल होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चाचणीतून निष्पन्न झाले होते.

दरम्यान जप्त करण्यात आलेली श्वान परत मिळावेत यासाठी मूळ बालकांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयात याबाबत सुनावणी पार पडल्यानंतर श्वानांची अवस्था पाहून मूळ मालकांना ते परत करण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर हे 12 श्वान पशुसंवर्धन विभागाकडे सोपविण्यात आले आहेत. तसेच या श्वानांच्या संगोपनासाठी तब्बल 94 हजार रुपये जमा करण्याचे आदेश मूळ मालकाला न्यायालयाने दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.