Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एक कोटीचे चरस जप्त

एमपीसीन्यूज : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थाचे वापर होण्याची शक्यता गृहीत धरून या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 34 किलो वजनाचे व एक कोटी रुपये किमतीचे चरस पोलिसांनी हस्तगत केले.

लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांचा बॅचमेट असलेल्या हिमाचल प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याने पुणे शहरात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर लोहमार्ग पोलिसांची चार पथके सतत सात दिवस दिल्ली वरून येणाऱ्या प्रत्येक रेल्वेवर करडी नजर ठेवून होते.

दरम्यान, 19 डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाडिया ब्रिजखाली दोन व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने त्याठिकाणी सापळा रचला होता. यादरम्यान रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आलेल्या दोन व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ललित कुमार दयानंद शर्मा (वय 49) कैलाससिंग रुपसिंग सिंग (वय 40) दोघेही हिमाचल प्रदेशातील रहिवाशी आहेत. या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेत 34 किलो 400 ग्रॅम चरस सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 1 कोटी 3 लाख रुपये इतकी आहे.

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता जप्त केलेल्या चरस मधील 22 किलो चरस मुंबई, पाच किलो गोवा, पाच किलो बंगलोर आणि दोन किलो पुणे शहरात वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या आसपास असणाऱ्या हॉटेलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये या चरसचा वापर होणार होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.