Pune Dam Update : खडकवासला, वरसगाव, पानशेत धरणे १०० टक्के भरली !

परतीच्या तुफान पावसामुळे धरणांमध्ये एकूण 29.13 टीएमसी जलसाठा

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणसाखळीतील चारही धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस झाला. परिणामी सर्व धरणे 100 टक्के भरली असून सर्व धरणांमध्ये एकूण 29.13 टीएमसी इतका जलसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील संभाव्य पाणी कपातीचे संकट तुर्तास तरी टळले आहे.

परतीच्या मॉन्सून पावसाने पुणे शहर, जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. गेल्या दोन दिवसांमध्ये सरासरी 97 मिलीमीटर इतका पाऊस पडला. शहरी आणि ग्रामीण भागासह धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्व धरणातील जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकृत माहितीनुसार, खडकवासला धरण 100 टक्के भरले असून शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 11.56 टीएमसी जलसाठा जमा झाला आहे. तर पानशेत धरणात 10.65 टीएमसी, वसरगाव धरणात 3.69 टीएमसी इतका जलसाठा जमा झाला आहे. टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असले तरी मृतसाठा 3.69 टीएमसी इतका साठा आहे.

खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे 100 टक्के भरल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी खडकवासला धरणातून 3 हजार 520 क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. येत्या उन्हाळ्यापर्यंत पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला आहे. शेतीसाठीची आगामी आवर्तने जरी असली तरी पुणेकरांना पुरेल इतका मुबलक जलसाठा चारही धरणांमध्ये साठला आहे.

परंतु खबरदारीचा उपाय म्हणून पुणे शहर आणि उपनगरातील काही भागांमध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा आणखी काही दिवस सुरू ठेवला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुणेकरांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने आणि जपून पाणी वापरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने शहर, उपनगर आणि जिल्ह्यात झोडपले असले तरी खडकवासला साखळीतील सर्व धरणे पूर्ण भरल्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मात्र मिटली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.