Pune : ‘चेटीचंड’मधून घडले सिंधी संस्कृतीचे दर्शन

सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०६९ वा जन्मोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – भगवान साई झुलेलाल यांची आरती… गायक जतीन उदासी यांचे बहारदार गायन… सिंधी गीतांच्या ऐकाव्याशा वाटणाऱ्या चाली… कलात्मक नृत्य… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि झुलेलाल यांचे अखंड भजन यातून नववर्षाच्या सुरुवातीला सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले.

निमित्त होते, सिंधी समाजाच्या नववर्षाचे. भगवान साई झुलेलाल यांच्या १०६९ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवनमध्ये झालेल्या या महोत्सवात संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या कार्यक्रमाला फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया प्रमुख पाहुणे म्हणून, तर विशेष अतिथी म्हणून विशाल चुगेरा, विजय अडवाणी उपस्थित होते.

  • सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, उपाध्यक्ष अशोक वासवानी, खजिनदार पिशू पर्यानी, सहसचिव परमानंद भटिजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, विजय दासवानी, सिमरन जेठवानी, डिंपल वासवानी, विनोद रोहानी आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शीतलदास जवाहरानी यांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास ५००० सिंधी बांधव सहभागी झाले होते.

चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो. अशा या सांस्कृतिक आणि सामाजिक महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भावना मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्सची आहे. समाजसेवेचे हे काम यापुढेही करत राहू, असे प्रकाश छाब्रिया यांनी यावेळी नमूद केले.

दीपक वाधवानी म्हणाले, “दोन दिवसांच्या चेटीचंड महोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी भगवान साई झुलेलाल यांची भव्य मिरवणूक व रथयात्रा काढली जाते. दुसऱ्या दिवशी झुलेलाल यांचे विधिवत पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रम व भजन होते. यंदा जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण आणि जतिन उदासी व सहकार्‍यांचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला. प्रीतीभोज आणि लकी ड्रॉने महोत्सवाची सांगता झाली.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.