Pune : गरज नसताना शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला ग्राहक मंचाचा दणका

एमपीसी न्यूज- चुकीच्या सोनोग्राफी अहवालाच्या आधारे गरज नसताना लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया करणे एका डॉक्टरला आणि डायग्नॉस्टिक सेंटरला चांगलेच महागात पडले आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने शस्त्रक्रियेचा खर्च आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी डॉक्‍टर आणि सेंटरने संबंधित रुग्णाला 1 लाख 20 हजार 60 रुपये रुग्णाला द्यावेत, असा आदेश दिला.

मोशी येथे राहणाऱ्या एका तरुणीला मूत्रनलिकेचा त्रास होत असल्याने ती डॉ. श्रीपाद नंदुरकर यांना भेटली. डॉक्‍टरांनी तिला काही चाचण्या करण्यास सांगितले. तरुणीने चिंचवडमधील फॅमिली केअर डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये चाचण्या केल्या. याबाबतचा अहवाल तिने डॉक्‍टरांना दाखविला. डॉक्‍टरांनी तिला लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यास सुचविले. सोनोग्राफी अहवालानुसार तिची लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेत तिच्या डाव्या अंडाशयात कोणत्याही प्रकारची गाठ न आढळल्याने लॅपरोस्कोपी करणे अनावश्‍यक असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या तरुणीने फॅमिली केअर डायग्नॉस्टिक सेंटर आणि डॉ. श्रीपाद नंदुरकर यांच्याविरोधात ऑगस्ट २०१८ मध्ये तक्रार दाखल केली होती. यात तिने शस्त्रक्रियेचा खर्च १६ हजार ९०० रुपये, रोगनिदानाचा खर्च ३ हजार १६० रुपये हा वार्षिक २४ टक्के व्याजाने परत मिळावा, तसेच नुकसानभरपाई म्हणून १ लाख रुपये, प्रवास खर्चासाठी ८ हजार रुपये आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी ५० हजार रुपये मिळावेत, अशी मागणी केली. खोटे निदान करून एखादी शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडणे ही सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब असल्याचा निष्कर्ष काढत मंचाने तरुणीच्या बाजूने निकाल दिला. मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्य अनिल जवळेकर, सदस्य शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.