Pune : पाळलेल्या कुत्र्यासाठी घातला जागरण गोंधळाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज- आपण पाळलेला प्राणी प्रत्येकाला जीव की प्राण असतो. त्याला काही आजार होऊ नये, त्याला त्रास होऊ नये यासाठी कुटुंबातील प्रत्येकजण जीवापाड जपत असतो. पुण्यातील एका कुटुंबाने देखील आपला लाडका कुत्रा आजारपणातून बरा व्हावा यासाठी चक्क जागरण गोंधळाचा कार्यक्रम घातला. एका कुत्र्यासाठी घातलेला हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे दोन वर्षे वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा आहे..त्याचे नाव ब्रुनो. या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खातापिता येत नव्हते. जाधव यांच्याकडे यापूर्वीही रॉटविलर जातीचा कुत्रा होता. पण तो दहा महिन्याचा असताना त्याला गॅस्ट्रो झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. जाधव यांच्या मुलीला ब्रुनोचा लळा लागल्यामुळे त्यांनी पुन्हा तसल्याच जातीचा कुत्रा आणला. परंतु त्यालाही गॅस्ट्रो झाला आणि आठ दिवस काहीही न खतापिता तो सलाईनवर होता.

तेव्हा जाधव यांच्या एका मित्राने खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाधव यांनी ब्रुनो आजारातून बरा होण्यासाठी जेजुरीच्या खंडोबाला नवस बोलला. त्यांच्या नवसाला खंडोबाने साद दिली असावी किंवा बोलाफुलाला गाठ पडली असावी ब्रुनो आजारातून चक्क पूर्णपणे बरा झाला. जाधव यांनी नवस बोलल्याप्रमाणे जागरण गोंधळ घालून नवस पूर्ण केला. यासाठी त्यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध गोंधळी अंकू-पंकू यांना बोलावून अगदी थाटात हा नवस पूर्ण केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.