Pune : पंडित केशव गिंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांनी गिरवले बासरी निर्मिती आणि वादनाचे धडे

एमपीसी न्यूज- मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे शिक्षक दिवंगत प्रभाकर यशवंत यांच्या स्मरणार्थ बासरी निर्मितीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना बासरी निर्मिती आणि वादनाचे धडे देण्यात आले.

कार्यशाळेला सुनिल अवचट, निलेश देशपांडे, प्रकाश बेहेरे, जितेंद्र रोकडे, प्रमोद देशपांडे, संजीव पाटणकर, अभय पटवर्धन, रमेश फडके, विजय अगरवाल इ. बासरीवादक उपस्थित होते. केशव गिंडे यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बासरीवादनाचे ज्ञान देताना बासरी वादनामधून ओंकाराचा अभ्यास अधिक ताकतीने करू शकतो, असे सांगितले.

बांबूला छेद करत स्वतः तयार केलेली बासरी हाताळण्यांची तसेच त्याचे वादन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. बासरीचे वैशिष्ट्य, बासरीच्या जन्माची, तसेच निर्मितीची कहाणी, तिचे प्रकार, तिच्या वादनाचे धडे अतिशय रंजकपणे गिंडे यांनी उलगडून दाखवले.

बासरी हे आदिम वाद्य आहे. या वाद्यामधून अनेक श्रुतीमनोहर स्वर वाजवता येतात. हे वाद्य दिसायला सोपे वाटले तरी यावर रागदारी वाजवायला अवघड आहे. हे स्वस्त आणि मस्त वाद्य आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारे वाद्य आहे. लहान मुलांमध्ये संगीताचे बीज रुजवायचे असेल, रुची निर्माण करायची असेल, तर संपूर्ण ओंकाराची अनुभूती देणाऱ्या बासरी या वाद्याची उपयुक्तता आहे, असे प्रतिपादन जेष्ठ बासरीवादक डॉ. केशव गिंडे यांनी ‘बासरीचे विज्ञान’ या विषयावर बोलताना केले.

केशव गिंडे यांनी बासरीवादनाने उपस्थितांची मने जिंकली. तबल्यावर अरविंद परांजपे यांनी त्यांना साथ केली. यावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, अशोक तातुगडे, दिपाली आकोलकर, संजय मा क, विनय आर आर, शशी भाटे, डॉ. सुजाता बरगले, संयोजक विलास रबडे आदी मान्यवर उपस्थित होते.दिपाली अकोलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राजेंद्रकुमार सराफ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.