-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : काचबंद कारमध्ये पाणी पिण्यासाठी मास्क काढला अन पोलिसांनी फाडली पावती

हा दंड कोर्टात अथवा ऑनलाईन माध्यमातून भरण्यास देखील पोलिसांनी संमती दिली नाही. आता आणि इथेच 500 रुपये देण्याची मागणी पोलिसांनी  केली.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कारमधून जात असताना सिग्नलवर कार थांबल्यानंतर पाणी पिण्यासाठी मास्क काढला. मास्क काढल्याचे पाहून वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवत कार चालकाच्या नावाने 500 रुपयांची पावती फाडली. हा प्रकार खडकी येथे घडला आहे. यामुळे नागरिकांमधून पोलिसांच्या अशा कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे कन्व्हेनर तुषार शिंदे पुण्यातून पिंपरीच्या दिशेने त्यांच्या कुटुंबीयांसोबत येत होते. खडकी जवळ एका सिग्नलवर त्यांची कार थांबली. कार चालवताना पाणी पिणे धोक्याचे असल्याने त्यांनी सिग्नलवर कार थांबल्यानंतर मास्क काढून पाणी प्यायले.

त्यावेळी त्यांच्या कारमध्ये त्यांच्याच कुटुंबातील सदस्य होते. हा प्रकार चौकात थांबलेले वाहतूक पोलीस पाहत होते. जसा शिंदे यांनी मास्क काढला, तशी वाहतूक पोलिसांनी शिंदे यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्या नावाने 500 रुपयांची पावती फाडली.

तुषार शिंदे म्हणाले, “कारच्या काचा बंद होत्या. कारमधील अन्य सदस्यांनी मास्क लावलेला होता. मी केवळ पाणी पिण्यासाठी मास्क काढलेला होता. ही बाब पोलिसांना समजावून सांगितली. मात्र, पोलिसांनी बळजबरीने माझी पावती फाडली.

हा दंड कोर्टात अथवा ऑनलाईन माध्यमातून भरण्यास देखील पोलिसांनी संमती दिली नाही. आता आणि इथेच 500 रुपये देण्याची मागणी पोलिसांनी  केली.

याबाबतच्या नियमांबाबत पोलिसांना विचारले असता, ते नियम तुम्ही ऑनलाईन बघून घ्या, अशी भाषा पोलिसांनी वापरली. पोलीस केवळ त्यांना दिलेले वसुलीचे टार्गेट पूर्ण करीत आहेत, असेच या प्रकारावरून दिसून येते, असेही शिंदे म्हणले.

शिंदे पुढे म्हणाले, “सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे. असा नियम शासनाने केला आहे. याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. ही बाब स्तुत्य आहे. पण शहरातील बहुतांश सिग्नलवर लहान लहान मुले प्लास्टिक पिशव्या विकतात.

ते प्रत्येक कारसमोर जाऊन काचा खाली करण्यास सांगून पिशव्या घेण्याबाबत विचारतात. ही अत्यंत धोकादायक आहे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या डोक्यादेखत दररोज घडतो. मात्र, पोलीस या मुलांना काहीच शिक्षा, दंड करीत नाहीत. पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाच्या रकमेतून किमान त्या मुलांना मास्क तरी खरेदी करून देण्याचे सौजन्य पोलिसांनी दाखवावे.

नियम सर्वांना सारखेच असायला हवेत. पोलीस दिसले की मला सुरक्षित वाटण्याऐवजी आता भीती वाटत आहे. त्यांच्यापासून लगेच दूर पळून जाण्याची माझी मानसिकता होत आहे. कारवाईच्या नावाखाली पोलीस सर्वसामान्य नागरिकांची लुट करीत आहेत.

पोलिसांनी नागरीक मोडत असलेल्या नियमांबाबत रीतसर सांगायला हवे. केवळ पावती केली आणि पैसे मागितले, हा प्रकार थांबवायला हवा. पोलिसांच्या कामाबाबत मला खूप आदर आहे. पण ही लूट थांबवून जनजागृती देखील करायला हवी, असेही शिंदे यांनी सांगितले.

असाच काहीसा प्रकार पुणे शहरात सिंहगड रोड परिसरात घडला आहे. 12 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास सायकलिंग करत असलेल्या गौरव कुमार यांना पुणे पोलिसांनी 500 रुपयांचा दंड आकारला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकट्याने व्यायाम करताना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. याची आठवण करून देत याबाबत कुमार यांनी पुणे पोलिसांना ट्विट देखील केले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नुकतेच सांगितले आहे की, “जर एकापेक्षा अधिक व्यक्ती एकाच ठिकाणी व्यायाम करत असतील तर मास्क घालणे आवश्यक आहे.

एकटा व्यक्ती सायकलिंग करत असेल तर त्याला मास्क घालण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले असल्याचेही भूषण म्हणाले.”

पुणेकर न्यूजने दिलेल्या वृत्तात पुण्याचे सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले आहेत की, “मास्क घालणे हे बंधनकारकच आहे. एकटा सायकलस्वार असला तरी त्याला मास्क घालणे आवशयक आहे.”

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn