Pune : शास्त्रीय संगीत कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी  ‘स्वर सन्निध’ संस्थेचे उदघाटन

एमपीसी न्यूज- भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत ‘ स्वर सन्निध ‘या संस्थेचे पिंपरी -चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. 
गुढी पाडव्याच्या दिवशी ढेपे वाडा येथे झालेल्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीने या संस्थेचा औपचारिक प्रारंभ झाला .प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक ,गायिका अर्चना कान्हेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

  • संस्थेच्या संस्थापक मीनल दातार (शास्त्रीय गायन ), निखिल पटवर्धन (सतार वादन ) यांनी ही उदघाटनाची मैफल रंगवली. हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, तबल्यावर निषाद पवार यांनी साथसंगत केली .
निखिल पटवर्धन यांनी सतारीवर जौनपुरी राग सादर करून रसिकांची मने जिंकली. मीनल दातार यांनी अल्हैया बिलावल राग सादर करून श्रोत्यांना भारावून सोडले. ‘दैय्या कहा गये ‘ या बडा ख्यालाबरोबर ‘कवन बतरीया गईलो’ही मध्य लयीतील अप्रतिम बंदिश त्यांनी सादर केली. शेवटी ‘जा रे ,जा रे’ ही द्रूत लयीतील  बंदिश आणि ‘का धरिला परदेस ‘ हे नाट्यपद ,’अवघा रंग एक झाला ‘ हा अभंग दातार यांनी सादर केला .
  • ‘भारतीय शास्त्रीय संगीत सर्वांपर्यंत,सर्व माध्यमातून पोहोचविणे हेच ‘स्वर सन्निध ‘संस्थेचे ध्येय असून संस्था या ध्येययपूर्तीसाठी कार्यरत राहील’,असे प्रतिपादन मीनल दातार यांनी यावेळी बोलताना केले. श्रावण हर्डीकर यांनीही आपल्या छोटेखानी भाषणातून संस्थेला शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.