Pune : आधी लगीन लोकशाहीचे मग माझे…….!

विवाहापूर्वी नववधूने बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज- भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. अप्पा बळवंत चौकातील नूमवी प्रशाला येथे नववधू श्रध्दा भगत हिने विवाहापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले.

लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये प्रबोधन केले जाते. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असतानाच पुण्यातील श्रद्धा गजानन भगत या तरुणीने लग्न मंडपात प्रवेश करण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी साडेसात वाजल्यापासून पुणे शहरात विविध मतदानकेंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशातच सकाळी पावणेदहाच्या सुमारास अप्पा बळवंत चौकातील नूमवी प्रशाला येथे मतदान सुरु असताना डोक्याला मुंडावळ्या, निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून एका नववधूने प्रवेश केला. तिचा उत्साह पाहून अन्य मतदारांनी जागा करून देत तिला पुढे जाण्याची विनंती केली. मात्र मी रांगेत उभी राहूनच मतदान करणार असे ठामपणे सांगितले. त्यानंतर तिने मतदान केले. तिच्यासोबत आलेल्या तिच्या नातेवाइकांनी सांगितले की श्रद्धाचे आज अमित सातपुते यांच्याशी विवाह होणार असून लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावायची म्हणून तिने विवाहापूर्वी मतदान केले.

याबाबत श्रद्धा म्हणाली, ” आज मी एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. पण त्याच दिवशी मतदान आहे. याचा मला खूप आनंद होत असून नव्या आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदानाचा हक्क बजावून पुढील प्रवासाला सुरुवात करण्याचे ठरविले. तसेच आज मी ज्या प्रकारे मतदानाचा हक्क बजावीत आहे. त्याप्रमाणे आज समाजातील प्रत्येक घटकाने मतदान करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.