Pune news : पण, तुम्हाला बोलवलं कुणी होतं का ? : अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला

एमपीसी न्यूज : ‘एकजण म्हणतो मी पुन्हा येईन, दुसरा म्हणतो मी परत जाईन.पण, तुम्हाला बोलवलं कुणी होतं का?, आता कसं वाटतयं गारगार वाटतयं, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

विधानभवन पुणे येथे आढावा बैठकीसाठी आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी फडणवीस आणि पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

पवार म्हणाले, मी मात्र पुन्हा येईन असंही म्हणत नाही आणि परत जाईन असंही म्हणणार नाही. पण मी आपल काम करत राहणार. तुम्हाला जनतेने 5 वर्षाकरता निवडून दिलं आहे. आता कुणी त्यांच्याकडे काम घेऊन गेलं, तर म्हणतील मी तर परत कोल्हापूरला चाललो, अरे काय यांचं चाललयं हे समजतच नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

पवार पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत काहीही निर्णय घेतला की दोन मतप्रवाह दिसतात. तसेच आता हे प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे आत्ताच्या स्थितीत सारासार विचार करून ईडब्ल्यूएसचा निर्णय घेतला आहे.

23 गावांचा समावेश पुणे महापालिका क्षेत्रात केला तर नियोजनबद्ध विकास होईल. तसेच समाविष्ट गावाबाबतचा हा निर्णय पालिका निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून घेतलेला नाही, असे स्पष्ट करत ‘एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस’, या प्रश्नावर पवार म्हणाले, मला माहित नाही. मलाही बातम्या वाचून, पाहूनच कळले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.