Pune News : विणकर, हातमाग व्यावसायिकांसाठी केंद्र सरकार सकारात्मक- मेधा कुलकर्णी

एमपीसी न्यूज – “विणकर, हातमाग व्यावसायिक यांच्यासाठी (Pune News) केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग आणि खाडी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. देशभरातील विणकरांची कलाकुसर प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडली आहे. त्यांच्या कलेला दाद देण्यासाठी पुणेकरांनी प्रतिसाद द्यावा,” असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुण्यात आयोजित भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक (नि.) श्रीनिवास राव, हर्षल हॉलचे शाम कासट आदी उपस्थित होते.

Pune News : राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत  सेनादल क्रीडा मंडळाचे वर्चस्व

हातमाग विकास आयुक्तालय, इंडिया हॅन्डलूम, हॅन्डलूम मार्क यांच्या सहकार्याने एकाच छताखाली हे प्रदर्शन होत आहे. महाराष्ट्रासह 14 राज्यांतील 50 पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे. प्रसंगी कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉलमध्ये 5 मार्च 2023 पर्यंत सकाळी 11  ते  8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “देशाच्या विविध भागात असलेली विशेषता हातमाग, कॉटन, सिल्क, लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर कलाकुसर, नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत. महिलांसाठी ही एक अनोखी पर्वणी आहे. पुणेकर खूप हौशी असून, या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वाटते.”

श्रीनिवास राव म्हणाले, “गुढी पाडवा आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन होत आहे. महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे हे प्रदर्शन आहे. कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे. रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते. ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत.”

पश्चिम बंगालच्या बुटीक साड्या, प्रिंटेड, चंदेरी, पैठणी, माहेश्वरी, बनारसी, गढवाल, कलमकरी, कांचीपुरम, करवथी अशा विविध राज्यांची ओळख असलेल्या असंख्य साड्या येथे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश अशा विविध भागांतून साड्या, ड्रेस मटेरियल व अन्य साहित्याचे स्टॉल लागले (Pune News) आहेत, असे राव यांनी नमूद केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.