Pune News : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमांतर्गत 75 हजार औषधी वनस्पतींचे वाटप

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुष मंत्रालय पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्राच्या वतीने 75 हजार औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले. आझादी का अमृतमहोत्सव या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम पार पडला.

हा राष्ट्रीय उपक्रम राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ व सुविधा केंद्राच्या वतीने शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय येथे पार पडला. याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते व विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. अविनाश आडे, आयुष मंत्रालायच्या सी.सी.आर.यू.एस. येथील डेप्युटी जनरल डॉ. असीम अली खान व डॉ.विजयकुमार तसेच संशोधन अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयुष मंत्रालयातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर सानवाल व सुविधा केंद्राचे प्रमुख संशोधक व विभागीय संचालक प्रा.डॉ. दिगंबर मोकाट यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात 75 शेतकऱ्यांना प्रत्येकी 100 याप्रमाणे 7500 चंदन व गुळवेल रोपांचे वाटप करण्यात आले. शेतकरी राजेंद्र गाडेकर व पांडुरंग वाठारकर व्यासपीठावर उपस्थित होते.

भारताने जगाला ‘योग व आयुर्वेद’ या दोन गोष्टी दिल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून औषधी वनस्पतीची लागवड होण्याचे प्रमाण वाढून आयुर्वेदाचा प्रसार होण्यास मदत होईल.
– प्रा.डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.