Pimpri News : गुरुकुल संस्कृत अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस साजरा

एमपीसी न्यूज – गीता आश्रम संस्थेच्या अंतर्गत गुरुकुल संस्कृत अकॅडमी मागील 10 वर्षांपासून संस्कृत भाषेच्या प्रसाराचे काम करत आहे. अकॅडमीच्या वतीने 22 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस पिंपरी येथे उत्साहात साजरा केला. कोरोना साथीमुळे कार्यक्रमाचे प्रसारण ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले.

गुरुकुल संस्कृत अकॅडमीमध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस साजरा केला जातो. कोरोना साथीमुळे प्रत्यक्ष कार्यक्रम न घेता नियम पाळून कार्यक्रमाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या संस्कृत भाषेतील कलाविष्कारांचा बहर मात्र तसाच कायम होता.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांत विविध विषयांवरील भाषणे, स्वरचित लघुनाटिका, कथाकथन, विनोदकथन, श्लोकगायन, गीतगायन इत्यादींचा समावेश होता. “अच्छे दिन” हा “ओट्टनतुळ्ळल्” ह्या केरळमधील सुप्रसिद्ध व लोकप्रिय असलेला कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

संस्थेचे प्रणेते आचार्य पद्मनाभन कृष्णदासा, अध्यापक अजित मेनन यांच्या परिश्रमातून आकारास आलेल्या गुरुकुल संस्कृत संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी, कानडी, तेलगू, मल्याळी, तमिळ, बंगाली, गुजराती, राजस्थानी, बिहारी अशा विविध प्रांतीयांचा, विविध वयोगटातील, पेशातील व क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे.

हा कार्यक्रम संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर https://www.youtube.com/c/GurukulSanskritAcademy पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.