Pune News : ई-झेस्ट कंपनीची पुणे मनपाला व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत

एमपीसी न्यूज – पुण्यातील ई-झेस्ट या सॉफ्टवेअर कंपनीने पुणे महानगरपालिकेला 5 व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत केली आहे. कोव्हिड -19 च्या सध्याच्या महामारीच्या काळात देशाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी देशाची ऑक्सिजनची गरज पूर्ण करणे व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या उद्देशाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर अर्थात एमसीसीआयए यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या मिशन वायु अंतर्गत ई-झेस्टच्या वतीने ही मदत करण्यात आली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपमहापौर सुनीता वाडेकर, MCCIA चे महासंचालक प्रशांत गिरबने, एमसीसीआयएच्या कार्यकारी समितीचे सदस्य व माहिती तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मायलॅब संस्थेचे सुजित जैन आणि ई झेस्ट संस्थेच्या डॅलिया दत्ता आदी या वेळी उपस्थित होते.

ई-झेस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र देशमुख म्हणाले, कोविडच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय उपकरणांची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने मिशन वायूसाठी एमसीसीआयएच्या वतीने पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड-19 रिस्पॉन्स (पीपीसीआर) या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत आरोग्य तंत्रज्ञान पुरविणारी संस्था म्हणून पुण्यात काम करीत असताना सामाजिक जाणीवेतून आम्ही पुणे महानगरपालिकेला 15 लाख रुपये किंमतीची उच्च दर्जाचे पाच BiPAP व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांची मदत करत असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.