Pune News : शाश्वत विकासासाठी विचारगट महत्त्वाचा ; संदीप वासलेकर यांचे मत

एमपीसी न्यूज – कोणत्याही देशाचे, संस्थेचे धोरण ठरवताना सर्वांगाने विचार व्हावा लागतो. त्या दृष्टीने समर्पित वृत्तीने विचार करणाऱ्या तटस्थ, तज्ज्ञ मंडळींचा विचारगट काम करत असतो. शाश्वत विकासासाठी असा विचारगट अतिशय महत्त्वाचा असून, भारतामध्ये राष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंत असे विचारगट स्थापन होण्याची गरज आहे, असे मत स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केले.

टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनतर्फे (टीटीए) ‘थिंक टॅंक : का आणि कसे?’ या विषयावर आयोजित व्याख्यानात संदीप वासलेकर बोलत होते. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन (डीएसटीए) आणि शुगर फॅक्टरीज फेडेरेशन (एसएफएफ) यांच्या सहयोगाने हे व्याख्यान झाले. प्रसंगी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, अजित चौगुले आदी उपस्थित होते.

संदीप वासलेकर म्हणाले, “सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्र, लष्कर, तंत्रज्ञान, पर्यावरण, पायाभूत सुविधा, पाणी, संशोधन आणि संस्कृती आदी गोष्टींच्या विकासाचे धोरण कसे असावे, हे विचारगट ठरवतो. प्रभावी विचारगटासाठी चांगले आर्थिक पाठबळ, तज्ज्ञ व्यक्तींचे योगदान, दूरदृष्टीकोन असणे गरजेचे असते. अलीकडच्या काळात विचारगटाचे महत्त्व सर्वच स्तरांवर अधोरेखित होत असून, ते विस्तारत आहे. शासकीयसह खासगी आस्थापना आणि उद्योगांमध्येही विचारगट स्थापन होत आहेत. अनुभवी, नवकल्पना असलेले ज्येष्ठ, तरुण, महिला अशा सगळ्यांमुळे विचारगट अधिक सक्षम होत आहेत. शांतता, संघर्ष आणि दहशतवाद यामध्येही विचारगटाची भूमिका महत्वपूर्ण राहते.”

“गेल्या दोन दशकात स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपने संयुक्त राष्ट्रे, स्वीडन, तुर्की, जॉर्डन, इराक, स्वित्झर्लंड, कॅनडा यासह 50 पेक्षा अधिक देशांना धोरणात्मक अहवाल तयार करून दिले आहेत. अनेक कंपन्या आणि संस्थांना त्यांचे धोरण ठरवण्यात सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रगतीत भर पडली आहे. देशांतर्गत सर्व आस्थापना आणि संस्थांनी याचे महत्व ओळखून स्वतंत्र विचारगट स्थापन करावेत. त्यातून आपली आणि देशाची प्रगती साधने शक्य होईल, असेही वासलेकर यांनी नमूद केले.

शेखर गायकवाड म्हणाले, नवकल्पना, ज्ञान सर्वांसाठी खुले होण्याची गरज आहे. विचारगटांचे स्वतंत्र अस्तित्व व त्यांची मान्यता दूरगामी असावी. सरकार बदलाचा परिणाम विचारगटावर किंवा त्यांनी तयार केलेल्या धोरणांवर होऊ नये. त्याचबरोबर विचारगट दबावगटही होता काम नयेत. पक्षीय विरोधामुळे सध्या अनेक चांगल्या योजना कालबाह्य होताना आपण पाहतो. त्यामुळे तटस्थ, निःपक्ष विचारगट उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत. ऊस शेतीची परंपरा जोपासण्यासाठी जागतिक दर्जाचे म्युझियम उभारण्याचे नियोजन सुरु आहे.

साखर उद्योग भारताला मिळालेली देणगी आहे. याचा लाभ जगाला व्हावा, यासाठी धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक असून, शेखर गायकवाड यांच्याकडून घेतला जाणारा पुढाकार आश्वासक आहे, असे यशवंत घारपुरे यांनी नमूद केले. श्रीपाद गंगावती यांनीही आपले विचार मांडले. विलास रबडे यांनी सूत्रसंचालन केले. अजित चौगुले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.