Pune News : प्रजासत्ताकदिनी चालू होणार ‘मएसो सुबोधवाणी’ वेब रेडिओ

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’ हे वेब रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम विज्ञान भारती संस्थेच्या मदतीने राबवण्यात येत आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते या सुबोधवाणी केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

एका मराठी माध्यमाच्या शाळेने सुरू केलेले हे देशातील पहिलेच वेब रेडिओ केंद्र ठरणार आहे. ‘मएसो सुबोधवाणी’मुळे या प्रचलित शिक्षण पद्धतीला सर्जनशीलता व उपक्रमशीलता याची जोड देत विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार आहे. वेब रेडिओमुळे या केंद्राचे प्रसारण जगभरात होणार आहे. हा कार्यक्रम एकाचवेळी दहा हजार श्रोते इंटरनेटद्वारे ऐकू शकतील.

श्रोत्यांना यासाठी मोबाईल ॲप डाऊनलोड करावे लागेल. या केंद्रासाठी ऑस्ट्रेलियातील कंपनीचा सर्व्हर भाड्याने घेण्यात आला आहे.

सध्याच्या शिक्षणातील ‘घोका आणि ओका’ ही पद्धत दूर सारून भविष्यात सक्षम आणि आत्मनिर्भर नागरिक घडावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी उपयुक्त ठरतील असे विविध कार्यक्रम या केंद्रावर सादर करण्यात येणार आहे. यादृष्टीने गरवारे महाविद्यालयाच्या अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची निर्मिती व प्रसारण करण्यात येणार आहे. सुरवातीला आठवड्यातून तीन दिवस प्रत्येकी एक तास प्रसरण करण्यात येणार आहे. सहा महिन्यानंतर आढावा घेऊन या केंद्राचा विस्तार करण्याची योजना असल्याचे इंजिनीअर सुधीर गाडे यांनी सांगितले.

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कार्यक्रम केंद्रावर सादर केला जाणार आहे. सर्जनशील व कल्पक विचारांना प्रवृत्त करणारा कंटेट हे ‘मएसो सुबोधवाणी’चे वैशिष्ट्य असेल. शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्याची मांडणी केली जाईल, असे विज्ञान भारती संस्थेचे विलास रबडे यांनी सांगितले.

विज्ञान भारतीने या उपक्रमासाठी महत्त्वाचे योगदान असून या संस्थेचे पुणे शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक र. वि. कुलकर्णी, सचिव प्रा. दाते तसेच श्रीकांत कुलकर्णी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.