Pune News: पोलीस आयुक्तांचा धडाका कायम; संतोष जगताप खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का

एमपीसी न्यूज: पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वीच कुविख्यात गुंड आणि वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा भर रस्त्यात निर्घुण खून करण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि टोळी प्रमुख महादेव आदलिंगे यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपीवर आता मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तांची ही ६० वी मोक्का कारवाई आहे.

महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २८, रा. उरूळी कांचन), स्वागत बापु खैरे (वय २५), पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय २९,), उमेश सोपान सोनवणे (वय ३५), अभिजीत अर्जुन यादव (वय २२, ता. बारामती), आकाश उर्फ बाळू जगन्नाथ वाघमोडे (वय २८) व महेश भाऊसाहेब सोनवणे (वय २८, रा. भांडवाडी वस्ती, ता. राहु) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

यातील टोळी प्रमुख असलेला महादेव आदलिंगे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. यातील आरोपी स्वागत खैरे याचा गोळीबारात मृत्यू झालेला आहे.
दरम्यान, या टोळीची लोणी काळभोर परिसरात दहशत आहे. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी कृत्ये केली आहेत.

त्यांनी टोळीचे वर्चस्व ठेवण्यासाठी तसेच २०११ साली यातील आरोपी उमेश सोनवणे याच्या भावाचा व चुलत्याचा खूनाचा बदला घेण्यासाठी कटरचून कुविख्यात गुंड संतोष जगताप याचा गोळ्या घालून खून केल्याचे समोर आले आहे. खूनप्रकरणात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या टोळीवर पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण व उस्मानाबाद शहरात एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. त्यांची या भागात दहशत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास घाबरतात. दरम्यान या सर्वाची गुन्हेगारी स्वरूपाचे पार्श्वभूमी पाहता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्याविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्तांची ही मोक्काची ६० वी कारवाई आहे. पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी गेल्या एक वर्षात ६० टोळ्यांवर मोक्का लावत जवळपास पाचशे गुन्हेगारांना कारागृहात पाठविले आहे. तर, एमपीडीएनुसार देखील कारागृहात सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.