Pune news: कांदा निर्यातबंदी ! राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पंतप्रधान, राज्यपालांना कांदे पाठवत केला निषेध

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) राज्यभरात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पोस्टाने कांदे आणि निवेदन पाठवत कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.

पुण्यातील सिटी पोस्ट ऑफिस येथून पंतप्रधान व राज्यपाल यांना कांदा व निवेदन देण्यात आले. प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, जगभरात लाॅकडाऊन असताना गारपीट, पाणी टंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा पीक घेतले आहे.

चार पैसे हातात मिळतील असं वाटत असतानाच लहरी केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी बाबत निर्णय घेतला.

या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. मुंबई जवळील उरण बंदरावर 5 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे. हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण?, असा सवाल चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आत्मनिर्भर बनविण्याची भाषा करतात. त्याचवेळी शेतकरी विरोधात निर्णय घेतात. मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार?.

राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली. तशीच वेळ माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहचवाव्यात, असेही त्या म्हणाल्या.

मोदी साहेबांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा भेट पाठवित आहोत. शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून निवेदनाच्या माध्यमातून कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी विनंती चाकणकर यांनी पंतप्रधानांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.