Pune News : पुण्यात 3,493 सार्वजनिक तर, 4,32,548 घरगुती गणपतीचे शांततेत विसर्जन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धातीने साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला (रविवारी) गणरायाला शांततेत निरोप देण्यात आला. पुण्यात 3 हजार 493 सार्वजनिक तर, 4 लाख 32 हजार 548 घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देत सार्वजनिक गणपतीचे मंडपातच, घरगुती गणपतीचे कृत्रिम हौदात तसेच घरात विसर्जन करण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता पुण्यातील 47 सार्वजनिक गणेश मंडळानी गणेशोत्सवात सहभाग घेतला नाही. पुणे पोलिसांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करत कोणतेही पारंपारिक कार्यक्रम न घेता, मिरवणुका न काढता जागेवरच विसर्जन करण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या होत्या. नागरिकांनी सूचनांचे तंतोतंत पालन केल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पुण्यातील पाच मानाचे गणपतीचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. त्यापैकी दगडूशेठ, भाऊ रंगारी आणि अखिल मंडई या गणपतींचे सांयकाळी साडे सहाच्या सुमारास विसर्जन करण्यात आले.

विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच पोलिसांच्या वतीने विसर्जन मार्गावर बंदोबस्त न लावता शहराच्या मध्यवर्ती भाग आणि मंडळाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. सार्वजनिक घाट आणि नदीपात्राच्या जवळ पोलिसांच्या वतीने पेट्रोलिंग करण्यात आले.

गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 3 अप्पर पोलीस आयुक्त, 10 उपायुक्त, 15 सहाय्यक आयुक्त, 74 पोलीस निरिक्षक, 323 सहाय्यक व पोलीस निरिक्षक, 3 हजार 603 पोलीस कर्मचारी, 173 होमगार्ड आणि एक एसआरपीएफ कंपनी बंदोबस्तावर लावण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.