Pune News: प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचं पुण्यात निधन

एमपीसी न्यूज: तरल वादनातून व्हायोलिनला गाते करणारे ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचे आज सकाळी पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन अबोल झाले आहे.

संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले.

‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.

महाराष्ट्र सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (2015), कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ’सूरसिंगार पुरस्कार’, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै 2017), गदिमा पुरस्कार, भारत गायन समाजातर्फे वसुंधरा पंडित पुरस्कार (2013) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.